नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीचा पोपट असं म्हटलं होतं. मलिक दिवसभर बोलत असतात त्यांना दुसरे काम नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. याला उत्तर देताना नवाब मलिक यांनी 'पोपट आणि भविष्यवाणीचा ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात, नवाब मलिक कधी पोपट होऊ शकत नाही' असं म्हटलं आहे.
लढणं हा माझा धर्म आहे
निष्पाप लोकांना जर कुणी अडकवत असेल, तर त्याविरोधात लढणं हा माझा धर्म आहे. समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) शंभरपेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या प्रकरणात अटक केली आहे. जर या राज्यात फर्जीवाडा करुन शेकडो लोकांना तुरुंगात टाकत असेल, हजारो कोटींची खंडणी वसूल करत असेल, तर माझी जबाबदारी आहे त्यांना अडवणं, त्यांना या फर्जी केसेसपासून थांबवणं, हे माझं कर्तव्य आहे, ते मी पार पाडतोय, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
26 बोगस प्रकरणांचा तपास करावा
अनुराग कश्यप यांनी त्यांचा अनुभव समोर आणला आहे. अनुराग कश्यपसारखे अनेक लोक या मुंबईत आहेत ज्यांच्याकडून या लोकांनी खंडणी वसूल करण्याचं काम केलेलं आहे. आता तपास सुरु आहे. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांना मी विनंती करतो, कि ठराविक लोकांकडून माहिती घेऊ नका, तुमच्या आतल्या अधिकाऱ्यांनी 26 प्रकरणांमध्ये जी बोगस प्रकरणं आहेत, ती सर्व प्रकरणं तुम्ही हातात घ्या, ज्या एका नायजेरियन नागरिकाला निष्पाप अडकवण्यात आलं, त्या प्रकरणातील पंच पुढे येऊन सांगतोय, की संबंध नसतानाही एका नायजेरियन व्यक्तीला पकडण्यात आलं, आपल्याकडून दहा कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या. पंच जर असं बोलत असतील, तर अशा प्रकरणांचा तपास करा, अशी विनंती नवाब मलिक यांनी केली आहे.
फिल्म स्टार्सकडून खंडणी वसूली
समीर वानखेडे यांनी ज्या काही केसेस केले आहेत, त्यातली संख्या बघा, दोन ग्रॅम, चार ग्रॅम, पाच ग्रॅम अशी आहे. एका केसमध्ये तीन फिल्म स्टार्सना बोलावण्यात आलं, पण त्या केसमध्ये आजपर्यंत कोणतीही अटक झालेली नाही, आणि ती केसही बंद झालेली नाही. याचा अर्थ खंडणी वसूल करण्यासाठी त्या केसचा वापर केला जात आहे, याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर आरोप
समीर वानखेडे दलित नाहीत, त्यांनी शेड्य़ुल्ड कास्टमधील एका मुलाचा अधिकार हिरावून घेतला आहे, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करुन लग्न लावलं होतं, हे सर्व लहानपणापासून मुस्लीम होते, त्यांच्या जन्मदाखल्यात समीर दाऊद वानखेडे असं नाव आहे. नंतर त्यांनी खोडाखोड केली आहे. त्यांच्या निकाहनाम्यात मुस्लीम आणि दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे, या आरोपांचाही नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे.