Chhatrapati Shivaji Maharaj Talwar In England : महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तममेढ रोवत परकीयांवर वचक ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत म्हटलं जातं. अशा या महाराजांनी शत्रूचा खात्मा करण्यासाठी वापरलेली वाघनखं परदेशाहून भारतात येणार असल्याचं काही दिवासंपूर्वीच निश्चित झालं. तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात असणार आहेत. त्यामागोमागच आता महाराजांची ऐतिहासिक अशी जगदंबा तलवारही भारतात येणार आहे.
जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याच्या मोहिमेला मागील काही दिवसांपासून वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. भास्कर घोरपडे यांनी सुरु केलेल्या या प्रयत्नांमध्ये आता महाराष्ट्र सरकारही सहभाग देत असून, आता ही तलवार भारतात पाठवण्यासाठी ऋषी सुनक यांच्याकडे सातत्यानं मागणी होताना दिसत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 2024 पर्यंत ही तलवार भारतात आणावी अशी विनंती सध्या जोर धरताना दिसत आहे. सध्याच्या घडीला ही तलवार लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार परत आणण्यासाठी सर्वप्रथम ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे तलवार परत मिळावी यासाठीची याचिका पाठवण्यात आली होती. महाराजांची ही तलवार देशाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असून, देशातील नागरिकांसाठी आणि त्यातही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तिचं भावनिक मूल्य अधिक आहे, असं या याचिकेत म्हटलं गेलं होतं.
भारतातून करण्यात आलेल्या या याचिकेचं उत्तर देत 1857 मध्ये कोल्हापूरच्या तत्कालीन महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवे यांना ही तलवार त्यांच्या भारत दौऱ्यात भेट दिली होती. ज्यानंतर ही तलवार अतिशय सुरक्षितपणे जतन करण्यात आली असून ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांना ती पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं होतं.
जगदंबा तलवारीचं वर्णन पाहता तिचं सौंदर्य आणि महत्त्वं लगेचच लक्षात येतं. ही एक युरोपियन एकपाती सरळ तलवार आहे. या तलवारीच्या दोन्ही बाजुंना खोबणी आहेत. एका खोबणीमध्ये IHS असं तीन वेळा कोरण्यात आलं आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्यावर गोलाकार परज आहे. तलवारीच्या मुठीपाशी सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे ठसठशीत हिरे आणि माणिक जडवण्यात आले आहेत, असं वर्णनांमध्ये आढळतं.