कर्मचारी नाशिक मनपाचा, सेवा मात्र राजकीय मंडळींच्या बंगल्यावर

मनपाचे कर्मचारी राजकीय मंडळींच्या बंगल्यावर तर काही पक्षाच्या कार्यालयात काम करत आहेत.

Updated: Mar 19, 2019, 01:57 PM IST
कर्मचारी नाशिक मनपाचा, सेवा मात्र राजकीय मंडळींच्या बंगल्यावर title=

किरण ताजणे, नाशिक : नाशिक महापालिकेतील गौडबंगाल समोर आला आहे. कर्मचारी नाशिक महापालिकेचा असला तरी सेवा मात्र राजकीय मंडळींच्या बंगल्यावर सुरु असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे हे बहाद्दर राजकीय मंडळींच्या आश्रयाने कशी धूळ फेक करतात. त्याला प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राजकीय मंडळी कसा आश्रय देतात हे समोर आलं आहे. नाशिक महानगर पालिकेत हजारो कर्मचारी काम करतात. पण त्याची पडताळणी केली तर नेमणूक कुठे आणि काम कुठं याचा थांगपत्ताच लागत नाही. धक्कादायक म्हणजे वर्षानुवर्षे काही कर्मचारी राजकीय मंडळींच्या बंगल्यावर तर काही पक्षाच्या कार्यालयात काम करत आहेत. त्यापैकीच एक बाळासाहेब शिंदे. अतिरिक्त आयुक्त कार्यालयात क्लार्क होते. मात्र राजकीय मंडळींच्या आशिर्वादाने शिंदे महापौर यांचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते. तीन महिन्यांपूर्वीच ते निवृत्त झाले मात्र तरीही राजकीय आणि पालिकेतील अधिकाऱ्यांच्या आश्रयाने पदाधिकारी यांचे काम पाहत आहेत.

शिंदे यांनी वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा पालिकेचा पगार लाटला. तसाच दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे रवी सोनवणे. यांची नेमणूक महापौरांच्या दालनात, काम मात्र भुजबळांच्या निवासस्थानी. काही सोनवणे आणि शिंदे यांनी पालिकेतील पदाधिकारी आणि पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत पक्षाच्या कार्यालयात आणि घरी कामे सुरू केली. २००५ पासून ते आजपर्यंत पालिकेत एक फाईल ही इकडची तिकडे न केलेले कर्मचारी हजारो रुपयांची रक्कम पदरी पाडून घेतात. पालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना आणि नगरसचिवांना याबाबत सर्व कल्पना असते. मात्र हा सर्व गौडबंगाल आयुक्तांपर्यंत जातच नाही. पालिकेतील सभागृह नेत्यांनी ही बाब आयुक्तांना पत्र देत उघडकीस आणली आहे.

दरम्यान शिंदे आणि सोनवणे सारखे अनेक महाशय पालिकेत सावळा गोंधळ करत आहेत. नेमणूक कुठे, कामे कुठे आणि पगार कसला याची कल्पना आयुक्तांनी केली तर आयुक्तांही चक्रावून जातील अशी परिस्थिती आहे. शिंदे आणि सोनवणे यांचे प्रकरण पाहताच अंतर्गत चौकशीच्या हालचाली सुरू झाली आहे. कर्मचारी संघटनाने याबाबत सावध भूमिका घेतली. असा कुठलाही प्रकार होत नसून असे जर आढळून आल्यास त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही याची ग्वाही दिली.

सर्वसामान्य जनता कराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये महापालिकेच्या आर्थिक तिजोरीत भर घालत असते. त्या तिजोरीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबर मूलभूत सुविधा आणि विकासकामे होत असतात. मात्र भोळ्याभाबड्या जनतेला अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय मंडळी कसा चुना लावतात. आणि गौडबंगाल करतात त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे पालिका आयुक्त या प्रकरणाला पाठीशी घालतात की कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.