पोलीस ठाण्यात पोलीसच 'टाईट' कशी करणार गुन्हेगारांविरुद्ध 'फाईट'

दारुड्यांची तक्रार करायला गेला होता नागरिक, पण पोलीस स्थानकातच सुरु होती ओलीपार्टी

Updated: Mar 16, 2022, 08:25 PM IST
पोलीस ठाण्यात पोलीसच 'टाईट' कशी करणार गुन्हेगारांविरुद्ध 'फाईट' title=

सागर गायकवाडसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधली गंगापूर रोडवरील डी के नगर पोलीस चौकीतच चक्क कायद्याच्या रक्षकांची ओली पार्टी सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे दारुड्यांचीच तक्रार करायला एका प्रतिष्ठित नागरीक गेला होता. तक्रार घ्यायची सोडून या मद्यपी पोलिसांनी त्या नागरिकालाच मारहाण केली.

एका उद्यानात रात्रीच्या वेळी काही टवाळखोरांचं मद्यपान सुरू होतं. त्याची तक्रार करण्यासाठी बाळासाहेब शिंदे पोलीस चौकीत गेले. तिथं त्यांच्या तक्रारीची दखल घेणं तर दूरच, पण मद्यपी पोलिसांनी बाळासाहेबांना आत घेऊन दार लावलं आणि दिवे बंद करून मारहाण केली. आसपासच्या लोकांनी आरडाओरड ऐकून आत प्रवेश केला तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये मांडलेल्या या गुत्त्याचा भांडाफोड झाला.

ही घटना उजेडात आल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दारूबाज 4 पोलिसांना तात्काळ निलंबित केलं आहे. 

गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूलचा भाग हा सुशिक्षितांचा परिसर म्हणून ओळखला जातो. तिथल्या पोलीस ठाण्यात ओली पार्टी रंगली आणि तक्रार द्यायला गेलेल्या नागरिकालाच मारहाण झाली. आता पोलिसांवर कारवाई झाली असली तरी राज्यात अन्यत्र हे प्रकार सुरू नाहीयेत ना, याची शहानिशा गृहखात्यानं करायला हवी. तरच नागरिकांना खाकी वर्दीचा आधार वाटेल.