मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत आहे. साताऱ्यात माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती होती. त्यावेळी शिवसेनेने आपल्या कोट्यातील हा मतदारसंघ रामदास आठवले यांच्या रिपाईसाठी सोडला होता. मात्र, आता रिपाई भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने ही मागणी मान्य केल्यास भाजप येथून नरेंद्र पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार करत आहे. नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत.
सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा बराच दबदबा आहे. ते सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मात्र, पक्षातील सर्व नेत्यांशी फटकून वागत असल्यामुळे अनेकांचा त्यांच्यावर रोष आहे. परिणामी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शाश्वती नाही. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीकही वाढली आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उदयनराजे यांनी सूचक वक्तव्य केले होते. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका, असे उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले होते.
महिन्याभरात लग्न आहे, अक्षता टाका, संपल्या म्हणू नका; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य
मात्र, आगामी निवडणुकीत प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने जिंकण्याची अधिक खात्री असलेल्या उमेदवारांनाच रिंगणात उतरवण्यासाठी शरद पवार आग्रही आहेत. काही दिवसांपूर्वीच उदयनराजेंची साताऱ्यात शरद पवार यांनी भेट घेत खासदारकीची जागा पक्की केल्याचेही वृत्त आहे. केवळ उदयनराजे यांनी अन्य मतदारसंघातही प्रचारासाठी यावे, अशी माफक अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली होती.