एक का डबल, नागपुरात व्यापाऱ्यांना फसवण्याचा 'असा' नवा फॉर्म्युला

बनावट लेटरपॅड वापरायचं आणि व्यापाऱ्यांची फसवणूक करायची.

Updated: Jun 3, 2022, 11:08 AM IST
एक का डबल, नागपुरात व्यापाऱ्यांना फसवण्याचा 'असा' नवा फॉर्म्युला  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : तुम्हाला जर कोणी सांगितलं की एवढी गुंतवणूक करा, तुम्हाला एवढा नफा मिळवून देतो. तर तुम्हाला पण गुंतवणूक करायची इच्छा होईल ना? बरं काही लोकांना यावर भरोसाही बसणार नाही पण जर तुम्हाला कंपनीच्या लेटरपॅडवर लिहून दिलं तर? आता तर नक्कीच बसेल ना. पण कुठल्याही कंपनीचे लेटरपॅड बनवण्यात येतं हे विसरु नका. नागपुरात अशाच फसवणुकीचा सुळसुळाट सुरु आहे. 

नेमकं प्रकरण काय?

बनावट लेटरपॅड वापरायचं आणि व्यापाऱ्यांची फसवणूक करायची. मोठ्या नामवंत कंपनीचे लेटरपॅड वापरुन व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. जगदीश कारवा असं या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जगदीश कारवासह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोठ्या कंपनींच्या नावाखाली फसवणूक - 

जगदीश कारवाने एका फसवणुकीत चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक आणि प्रसिद्ध सीए राजेश लोया यांच्या फर्मचे बनावट लेटरपॅडचा वापर करत व्यापाऱ्यांची दिशाभूल केली. वाठोडा पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याने 25 लाखाचा फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर जगदीश कारवाला अटक करण्यात आले.

मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेत छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज - 

जगदीशने व्यापाऱ्यांना पैसे डबल होण्याचे आमिष दाखले. आता 25 लाख रुपये गुंतवणूक करा तुम्हाला 3 - 4 महिन्यात 3 लाखांचा फायदा करुन देतो असं व्यापाऱ्याला सांगितले. व्यापाऱ्याला विश्वास बसवण्यासाठी कोटक बँकेचा बनावट धनादेश आणि लेटरपॅडवर सीए लोया यांची सही घेऊन व्यापाऱ्याला सुपूर्द केले. व्यापाऱ्याने पैसे दिल्यानंतर 4 महिन्यात जगदीश कारवाने पैसे परत न करता टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. मात्र पैसे परत न केल्यामुळे व्यापाऱ्याला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

स्वत:चाच छापखाना - 

आरोपी जगदीश कारवाचा स्वत:चा छापखाना असल्याचा फायदा घेत अनेक मोठ्या कंपनीचे लेटरपॅड स्वत:च छापत असल्याचे उघडकीस आले आहे.