पराग ढोबळे, झी मीडिया
Nagpur Crime News: दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या वडिलांची मुलानेच हत्या केली आहे. नागपूरात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संजय निधेकर असं मृतक वडिलांचे नाव असून साहिल असं आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलाला अटक केली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक संजय याला दारूचे व्यसन होते. कुठलंही काम न करता संजय हा पत्नीला दारू पिऊन मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही संजय हा दारू पिऊन आला होता. त्यानंतर त्याने पिंकी निधेकरला मारहाण करण्यास सुरुवात झाली. त्यातूनच त्यांच्यात मोठे वाद झाले. मुलगा साहिलला याची माहिती मिळाली होती. त्याने आईला त्याच्या आजीच्या घरी सोडले आणि वडिलांना शोधण्यासाठी निघाला.
साहिलने रागाच्या भरात असतानाच त्याला वडिल विवेकानंद चौकात असल्याची माहिती मिळाली. वडिलांना दारूच्या नशेत पाहताच त्यांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांच्या खून केला आणि घटनास्थळावरुन पसार झाला. संजय हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच काहींनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याच्या मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली असता मोठा मुलगा साहिल यांनेच वडिलांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने मुलगा साहिलला अटक केली आहे.
कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात क्षुल्लक कारणातून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रेमचंद निषाद अस मृतकाचं नाव आहे. तर, भुपेंद्र बागमरिया असे मारेकऱ्या तरुणाचे नाव आहे.
घटनेच्या एक दिवसापुर्वी गणपती कार्यक्रमात शाब्दिक वाद झाला होता. याचा समझोता करण्यासाठी प्रेमचंद हा भुपेंद्र यांच्या घरी गेला होता. त्यानंतर दोघांमधील वादाने टोक गाठले. यावेळी भुपेंद्रने चाकूने प्रेमचंदच्या शरीरावर गंभीररित्या वार केला. यात प्रेमचंदचा मृत्यू झाला. पोलिसांनी भुपेंद्र बागमरिया याला अटक केलीय.