चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : बदलापूर- मुरबाड रस्त्यावर स्टंट करणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं आहे. फ्रंट व्हिली मारताना एका दुचाकीस्वाराची फजिती झाली. दुचाकीसह तो स्टंटबाज चक्क तोंडावर पडला आहे. त्याची ही फटफजिती चांगलीच व्हायरल झालीय.
स्टंटबाज दुचाकीस्वार म्हटलं तर त्याला फ्रँट व्हिली आणि बॅक व्हिली आलीच पाहिजे अशी समज आहे. देशविदेशात दुचाकीस्वार असे फ्रंट व्हिली आणि बॅक व्हिली मारताना दिसतात. फ्रंट व्हिली म्हणजे दुचाकीस्वार आणि दुचाकीचं संतुलन. यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. पण काही अतिहौशी लोकांचं तसं नसतं. एखाद्या कृतीचा अभ्यास करायचा नसतो. त्यांना झटपट प्रसिद्धी हवी असते. बदलापूरजवळच्या मुरबाड रस्त्यावरही एका अतिहौशी तरूणाला फ्रंट व्हिली मारायची होती. त्याला त्याचा टिकटॉक व्हिडिओ बनवायचा होता.
सुसाट बाईक चालवत आला. त्यानं फ्रंट व्हिलीसाठी ब्रेकही दाबला. पण त्याचं गणित चुकलं. बाईकचा मागचा भाग अधिकच पुढं गेला. आणि बाईकस्वार तोंडावर जमिनीवर आपटला. टिक टॉक व्हिडिओ तर लांब राहिला हा नवा फजितीचा व्हिडिओ व्हायरल झाला.
बदलापूर मुरबाड रस्त्यावर काही तरूण वेगानं दुचाकी चालवून गोंधळ घालतात. या ठिकाणी प्रसंगी अपघातही होण्याची शक्यता असते. पोलिसांनी या रस्त्यावर गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांमधून करण्यात येते आहे.
फ्रंट व्हिलीच्या नादात बाईक अंगावर घेऊन पडसलेल्या तरूणाचं पुढं काय झालं माहिती नाही. फटफजिती झाल्यानं पण पुन्हा तो असा प्रयत्नही करणार नाही हे मात्र निश्चित.