मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं; वर्षभराची चिंता मिटणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं आहे.

वनिता कांबळे | Updated: Jul 24, 2024, 09:36 PM IST
मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं;  वर्षभराची चिंता मिटणार title=

Mumbai Tansa Dam Overflow : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं आहे. तानसा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो झालं. मुंबईची पाण्याची तहान 5 धरणं आणि 2 तलावांद्वारे भागवली जाते. या 5 धरणांपैकी तानसा हे 1 धरण आहे. ते आता ओसंडून वाहू लागलं आहे. तर इतरही धरण क्षेत्रांत चांगला पाऊस होतोय. त्यामुळे मुंबईकरांची पुढल्या वर्षभराची पाण्याची चिंता हळूहळू मिटण्याच्या मार्गावर आहे. 

हे देखील वाचा - धरणात xx का? च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग; अजित पवारांवर सुषमा अंधारेंचा निशाणा

 

मुंबईसाठी डिसेंबरपर्यंत पुरणारा पाणीसाठा जमा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सात तलावांत 592866 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटरचा पाणीसाठा पाहता हे पाणी डिसेंबर 2024 पर्यंत पुरणारे आहे. सात तलावांत सध्या एकूण 41 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा होणाऱ्या तलावांत तुळशी तलाव सकाळी 8.30 वाजता ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईसाठी चांगली बातमी मिळाली आहे.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. याआधी पवई तलाव 8 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. पवई तलावाचे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरण्यात येते. तर शनिवार, 20 जुलै रोजी तुळशी तलाव ओव्हर फ्लो झाला. धरण क्षेत्रात पावसाची अशीच दमदार बॅटिंग सुरू राहिली तर लवकरच मुंबईकरांवरील 10 टक्के पाणीकपात रद्द होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले. महानगरपालिकेचा 'तुळशी तलाव' शनिवार, 20 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षीदेखील 20 जुलै 2023 रोजीच मध्यरात्री 1.28 वाजताच्या सुमारास हा तलाव भरून वाहू लागला होता.

नांदेडला पाणी पुरवठा करणा-या विष्णुपुरी धरणात 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध

नांदेडला पाणी पुरवठा करणा-या विष्णुपुरी धरणात 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे नदीत पाण्याची आवक वाढलीय. तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झालीय.  

चिल्हेवाडी धरण ओव्हर फ्लो

जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे चिल्हेवाडी धरण ओव्हर फ्लो झालंय... धरणातून मांडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.. पावसाची संततधार सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे... प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...