सागर आव्हाड, झी मीडिया, राजगड (Rajgad) किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाल्याचे समोर आले आहे. दर्शना पवारच्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. त्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
राज्यात एमपीएससी परिक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ उकलण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. "त्या" मित्राचा कसून शोध घेतला जात आहे. २६ वर्षीय दर्शना पवार हिचा काल राजगड किल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जिल्हा हादरून गेला होता. त्यामुळे दर्शना हिच्यासोबत नेमकं घडल काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान या प्रकरणात पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार हिचा रविवारी सकाळी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला झाडीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी तिची ओळख पटवत तपास सुरू केला. दर्शना मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तिने स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत पोस्ट काढली होती. पुण्यात ती अॅकडमीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी आली होती. सत्कारानंतर ती ट्रेकींगला गेली अन् परतलीच नाही.
१२ जून रोजी दर्शना वारजेत राहणारा तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत किल्ले सिंहगड येथे ट्रेकींगसाठी जात असल्याचे सांगून गेली होती. पण सायंकाळनंतरही ती परतली नाही. म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे फोन बंद होते. दर्शना व राहुल दोघांच्याही कुटूंबाने शोध घेतला. पण, दोघेही सापडले नाहीत. तेव्हा दर्शनाच्या कुटुंबियांनी सिंहगड रोड तर राहुलच्या कुटूंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण, दुर्दैवाने रविवारी तिचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटवल्यानंतर पोलिसांकडून आता याप्रकरणाचा कसून शोध सुरू केला आहे.
राहुल फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. राजगड परिसरातील सीसीटीव्हीतून काही माहिती समोर आली आहे. दर्शना आणि राहुल दोघेही १२ जूनला राजगडावर दुचाकीने गेले. साधारण सव्वा सहाच्या सुमारास ते गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. मात्र, १० वाजण्याच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली. राहुल सध्या बेपत्ता आहे. तो नेमका कुठे आहे. याचा पोलीस शोध घेत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी ५ पथके तयार केली आहेत. त्यानुसार संशयास्पद मृत्यूचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, दर्शना हिचे पोस्टमार्टम झाले असून, तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे रात्रीपर्यंत समजेल असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यावरून देखील काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत