MPSC मधील डमी उमेदवार रॅकेट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

आर्थिक गुन्हा शाखेनं सुरूवातीला हा गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न केला, अशी खळबळजनक बाब उजेडात आली आहे.

Jaywant Patil Updated: Mar 19, 2018, 10:28 PM IST
MPSC मधील डमी उमेदवार रॅकेट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? title=

नांदेड : MPSC मधील डमी उमेदवार रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहेच नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेनं सुरूवातीला हा गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न केला, अशी खळबळजनक बाब उजेडात आली आहे

पोलिसांनी हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला?

पण हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर ज्यांच्या हाती या घोटाळ्याचा तपास होता, त्याच पोलीसांनी हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब झी २४ तासच्या हाती लागली आहे. योगेश जाधवच्या तक्रारीनंतर नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलीसात या डमी रॅकेटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो तपास नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

पोलिसांचं बिंग फुटलं..

मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सोनसकर आणि त्यांचा रीडर भगवान झंपलवाड यांनी या प्रकरणातील आरोपींना मदत करून तपास दाबण्याचा प्रयत्न केला. विशेष तपास पथकाकडं या गैरव्यवहाराचा तपास गेल्यानंतर पोलिसांचं बिंग फुटलं..

दिनेश सोनसकर आणि झंपलवाडनं मूळ उमेदवार अणि डमी उमेदवारांचे दुसरे हस्ताक्षर पंचनामे बनवण्यात आले. सोनसकरनं कोरे पंचनामे रॅकेटचा मुख्य सूत्रधार प्रबोध राठोड याला दिले. प्रबोध राठोडनं मूळ उमेदवारांच्या जागी बसणाऱ्या डमी उमेदवाराचं हस्ताक्षर घेऊन औरंगाबाद येथील हस्ताक्षरतज्ञ योगेश पंचवटकर याला दिलं.

डमी उमेदवारांनी कोऱ्या पंचनामा फॉर्मवर सह्या

पण तेही हस्ताक्षर योग्य नसल्यानं मूळ उमेदवार आणि डमी उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात आली. मूळ उमेदवार आणि डमी उमेदवारांनी कोऱ्या पंचनामा फॉर्मवर सह्या केल्या. मोठी रक्कम घेऊन हस्ताक्षर तज्ञ योगेश पंचवटकरनं खोटा अहवाल दिला. ही कागदपत्रं प्रबोध राठोडनं नांदेडला तपास करणाऱ्या दिनेश सोनसकरला दिली.
विशेष तपास पथकानं सोनसकरच्या कपाटातून हे दस्तएवज हस्तगत केलेत.

याप्रकरणी दिनेश सोनसकर आणि भगवान झंपलवाड या दोघांसह १५ हून अधिक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय. रॅकेटचा म्होरक्या प्रबोध राठोड यालाही विशेष तपास पथकानं अटक केलीय. या राठोडनं या गैरव्यवहारातून मोठं घबाड कमवलंय...

प्रबोध राठोड, त्याची आई, वडील, भाऊ आणि नातेवाईकांच्या नावावर सुमारे 100 एकर जमीन असल्याचा अंदाज आहे.
मांडवी येथं त्याचं 70 लाख रूपये किंमतीचं घर आहे. मांडवी बस स्टॅण्डजवळचं त्याचा सुमारे 1 कोटी रूपये किंमतीचा कॉम्प्लेक्स आहे. शेतात जाण्यासाठी त्यानं 50 लाख रूपये खर्च करून रस्ता बांधला. त्याच्या फार्म हाऊसची किंमत सुमारे 30 लाख रूपये आहे.

नांदेडच्या यशोविहार नगरीत त्याचा सव्वा कोटी रूपयांचा बंगला आहे. औरंगाबाद कॅनॉट प्लेस मेघ मल्हार कॉप्म्लेक्समध्ये त्याचा 50 लाख रूपये किंमतीचा 2 बीएचके फ्लॅट आहे. ईनोव्हा, स्कॉर्पिओ अशा 3 चार चाकी गाड्या आहेत. शिवाय पत्नी, मुली, आई, वडील, भाऊ, यांच्या नावानं कोट्यवधी रुपयांच्या विमा पॉलिसी आहेत. त्यापोटी वर्षाला 10 लाख रुपयांचा हप्ता तो भरतो.

MPSC भरती गैरव्यवहार 2007 पासून सुरू असून याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याचं विशेष तपास पथकानंच दोषारोपपत्रात स्पष्ट केलंय. अशाप्रकारे 1 हजारहून अधिक अपात्र उमेदवारांना शासकीय नोकरी मिळवून देण्यात आल्याचा अंदाज आहे.

झी 24 तासने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता MPSC मधील या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडूनही गंभीर दखल घेतली जात आहे. विरोधकांनी मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनातही हे प्रकरण उचलून धरलं होतं. व्यापम घोटाळ्याप्रमाणे MPSC घोटाळ्याची व्याप्तीही मोठी असल्याने त्याचा तपास सीबीआयकडे देण्याचीही मागणी केली जातेय.