Lonavala Picnic : पावसाळी सहलीसाठी लोणावळ्याला निघताय? एक चूकही पडेल महागात

Lonavala News : (Monsoon Picnic) मान्सूनची सुरुवात होताच अनेक भटकंतीप्रिय व्यक्तींचे पाय गडकिल्यांच्या दिशेनं वळतात. काही मंडळी ठरलेली ठिकाणं फिरण्यासाठी पुन्हापुन्हा जातात. लोणावळा हे त्यातलंच एक...   

सायली पाटील | Updated: Jul 8, 2023, 01:43 PM IST
Lonavala Picnic : पावसाळी सहलीसाठी लोणावळ्याला निघताय? एक चूकही पडेल महागात  title=
monsoon picnic lonavla Police to keep eye on torusits visiting the spot

Lonavala News : महाराष्ट्रात पावसानं चांगला जोर धरलेला असताना आता अनेकांनीच पावसाळी सहलींसाठीचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीही याच यादीत येता का? काय म्हणता, पावसाळी सहलीसाठी ठिकाणही निवडलंय? लोणावळ्याला जायच्या विचारात असाल, तर थांबा आधी ही माहिती पाहा. म्हणजे नंतर लहानशी चूकही महागात पडायला नको. 

लोणावळ्यात पोलिसांची पर्यटकांवर करडी नजर 

लोणावळ्या दर पावसाळ्यामध्ये पर्यटकांची होणारी गर्दी पाहता पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाकडून बऱ्याचदा काही महत्त्वाची पावलं उचलली जातात. पर्यटकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये याचीच काळजी ही मंडळी घेत असतात. अशाच एका कारणासाठी लोणावला पोलीस सज्ज झाले आहेत. जिथं हुल्लडबाज पर्यटकांवर त्यांची करडी नजर असणार आहे. 

लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर साध्या वेशात पोलीस गस्त घालणार आहेत. त्यामुळं कोणीही हुल्लडबाजी किंवा स्टंटबाजी करताना दिसलं तर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. फक्त कारवाईच नव्हे, तर या हुल्लडबाजांना थेट जेलची हवाही खावी लागू शकते. 

लोणावळ्यातील भुशी डॅमसह नजीकच्या अनेक धबधब्यांवर पर्यटक मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात. मात्र काहीजणांमुळे मात्र इतर पर्यटकांना त्रास होतो. काहींना स्टंडबाजी महागात पडते, इतकच काय तर काह अतिउत्साह काहींच्या जीवावरही बेततो. त्यामुळं अशा पर्यटकांवर चाप बसवण्यासाठी पोलीस कारवाईचा बडगा उगारताना दिसणार आहेत.

हेसुद्धा वाचा : शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर 

लोणावळ्यात मुसधार पाऊस... 

शुक्रवारपासून लोणावळ्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मागील 48 तासांमध्ये इथं मुसळधार पावसामुळं बहुतांश भागांमध्ये गारवा पसरला आहे. तर, या भागामध्ये असणारे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहे. मागील चार दिवस लोणावळ्यात पावसाचा जोर कमी झाला होता. पण, शुक्रवारपासून मात्र पावसानं इथं पुन्हा बॅटिंग सुरु केली. अवघ्या 24 तासांत इथं तब्बल 108 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तिथं पावसामुळं लोणावळ्यात मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.