मुंबई : शेतकरी आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मान्सूनची गाडी सुसाट धावत आहे. त्यामुळे राज्यात मान्सून लवकर येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मोसमी पाऊस रविवारी अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे.
दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारी संध्याकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे.
वा-यांचा वेग किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे मान्सूनचं आगमन पाच दिवस आधीच होणारेय. मान्सून केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत दाखल होईल. तळकोकणात मान्सून 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.
20 मेपासून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 20 मे ते 26 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला.
पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 27 जूननंतरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढलीय. त्यामुळे ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे राज्यात तापमान कमीच राहण्याची शक्यता आहे.