माकडिणीने यासाठी धरलं कॉर्पोरेशन बँकेचं दार (व्हिडिओ)

ठाण्यातील टिकुजिनी वाडीतील एका बँकेबाहेर गर्दी उसळली होती.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 1, 2018, 09:43 PM IST
माकडिणीने यासाठी धरलं कॉर्पोरेशन बँकेचं दार (व्हिडिओ)  title=

मुंबई : ठाण्यातील टिकुजिनी वाडीतील एका बँकेबाहेर गर्दी उसळली होती.

बँकेची वेळ झाली तरी उघडली नसल्यामुळे बाहेर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती. तेथे येणारा प्रत्येकजण बँकच्या दिशेने पोहोचत होता. परंतु, त्याला पुढे जाता येत नव्हते. या सगळ्यांना एका माकडिणीने रोखून धरले होते. या बँकेच्या प्रवेशद्वाराजवळच तिचे पिल्लू जखमी अवस्थेत पडले होते. हालचालही करता येत नसलेल्या या पिलाच्या रक्षणासाठी माकडिणीने येथील सगळ्यांना रोखून धरले होते. अन्य तीन माकडेही या भागात असल्यामुळे त्यांनी सगळा परिसर रोखला होता. प्राणीमित्रांनी या पिलास उपचारासाठी हलवले. परंतु या पिलाच्या रक्षणासाठी तिच्या आईने चालवलेला दिड तासांचा संघर्ष सगळ्यांसाठीच हृदयद्रावक होता. 

:संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारी असलेल्या टिकुजीनी वाडीच्या परिसरामध्ये माकडांचा मोठा राबता असून अनेक माकडे या भागामध्ये येत असतात. त्यांच्याकडून काही उपद्रव होत नसला तरी काही भटकी माकडे शहरातच राहू लागली आहेत. टिकुजिनी भागामध्ये माकडांचे एक टोळके फिरत असताना तेथे असलेल्या एका माकडिणीचे पिल्लू अचानक खाली कोसळले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. उंचावरून खाली कोसळल्यामुळे हे माकडाचे पिल्लू गंभीर जखमी झाले होते. कोसळलेल्या अवस्थेतून त्याला हलताही येत नव्हते.

त्यावेळी त्याची आई असलेली माकडीण खाली उतरली आणि ती त्या पिलाजवळ बसून राहिली. तर अन्य माकडे तिच्या अवतीभवती संरक्षणाला उभे ठाकले. या भागातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर ते धावून जाऊ लागल्यामुळे या ठिकाणी असलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी रोखून ठेवले. बँक उघडण्याची वेळ झाली तरी हे माकडांचे टोळके तेथून हलत नव्हते. अनेकांनी त्या माकडिणीस हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु सगळ्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कौस्तुभ दरवेस यास कळताच तो या ठिकाणी पोहचला. त्याने अन्य सहकार्याच्या मदतीने माकडिणीला दूर नेऊन या पिलास उपचारासाठी एसपीसीए रुग्णालयात दाखल केले.

उंचावरून पडल्यामुळे माकडाचे पिल्लू गंभीर जखमी झाले होते. त्याच्या पाठीच्या कण्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी आल्यानंतर त्याला थेट आयसीयुमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. परंतु त्याचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद कमी होऊन मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती ठाणे वनविभागाला देण्यात आली. त्याचा मृतदेहही वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती, एसपीसीए रुग्णालयाचे व्यवस्थापक संजय जाधव यांनी दिली.