मिरज : आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरात हृदयाची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. शरीराची चिरफाड न करता हृदयातील वॉल बदलण्यात आल आहे. पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिली शस्त्रक्रिया सेवा सदन हॉस्पिटल मध्ये यशस्वी करण्यात आली. लक्ष्मण माने या 54 वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून 25 लाख रुपयाची TAVI ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.
हृदयातील वॉल खराब झाली की ओपन हार्ट सर्जरी करावी लागते मात्र आता TAVI (Percutaneous Aortic Valve Replacment) ही शस्त्रक्रिया करता येते. जगभरातील मोजक्याच रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया केली जाते. जगात प्रथम ही शस्त्रक्रिया 2011साली करण्यात आली होती. अशी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात मिरजेचा ही समावेश झाला आहे. अतिशय दुर्मिळ ठरणारी अशी ही शस्त्रक्रिया मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मण माने या 54 वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सेवासदन मधील अनुभवी डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सोयीसुविधा यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
TAVI ही शस्त्रक्रिया बायपास सारखी चिरफाड न करता केली जाते जांगेतील रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत पोचवत योग्य त्या संसाधनाचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रिये वेळी उद्भवणारे सर्व धोके टाळले जातात असे डॉ. रविकांत पाटील सांगतात.
हृदयाचं वॉल बदलण्याची शस्त्रक्रिया अर्थात ओपन हार्ट सर्जरी करणं ज्यांना शक्य नसते तसेच खूप जास्त किंवा खूप कमी वय असलेल्या साठी सुद्धा ही TAVI शस्त्रक्रिया करणे सोयीचे ठरते. पश्चिम महाराष्ट्रातील पहिली शस्त्रक्रिया सेवासदन हॉस्पिटल यशस्वी झाली. 25 लाख रुपयांची ही शस्त्रक्रिया सेवासदन हॉस्पिटल मध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आल्याचे डॉ. तुषार धोपाडे यांनी सांगितले. मात्र यातील सर्वात अडचणीची गोष्ट म्हणजे यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉलची किंमत अधिक आहे. त्यामुळे भविष्यात समाजातील सर्व घटकांनी रुग्णांना या बाबत मदत करण्यास पुढे येण्याचे आवाहन डॉक्टरांनी केला आहे. ओपन हार्ट शस्त्रक्रिया पाच ते सहा तासांची असते, मात्र TAVI शस्त्रक्रिया केवळ तीन ते चार तासांमध्ये पूर्ण होते. तसेच रुग्णालाही जादा काळ रुग्णालयात थांबावे लागत नाही. दोन ते तीन दिवसांतच त्याला घरी पाठवले जाते.
मिरजेत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होत असल्याने मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे जाण्याऐवजी, रुग्णावर मिरजेतच उपचार आणि शस्त्रक्रिया होत आहेत. शिवाय कमी खर्चात उपचार होत असल्याने मोठ्या शहरातीलच रुग्ण मिरजेकडे येत आहेत.