१५-१७ वर्षातच धरण फुटणं गंभीर, सखोल चौकशी होणार - गिरीश महाजन

 केवळ २० वर्षांत हे धरण फुटल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Updated: Jul 3, 2019, 02:40 PM IST
१५-१७ वर्षातच धरण फुटणं गंभीर, सखोल चौकशी होणार - गिरीश महाजन title=

रत्नागिरी : १५-१७ वर्षातच धरण फुटणं गंभीर बाब आहे. तिवरे धरणाची दुरूस्ती मे महिन्यात केली होती, तरीही धरण का फुटले याची पूर्ण चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्य़ांनी देखील सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मे महिन्यात धरणाची डागडुजी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तरीही ही दुर्दैव घटना घटली आहे. अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी झी २४ तासशी बोलताना दिली आहे. तर तिवरे भेंडेवाडी धरण दुर्घटनेसाठी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. धरणाची डागडुजी योग्य प्रकारे केली नसल्यामुळे धरण फुटल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुर्घटनाग्रस्त तिवरे धरणाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिपळूणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण हेच याच धरणाचे ठेकेदार असल्याचं उघड झालं आहे. त्यांच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीनं हे धरण बांधलं होतं. केवळ २० वर्षांत हे धरण फुटल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र याची डागडुजी व्यवस्थित न झाल्यामुळे धरण फुटल्याचा दावा आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे. गेल्या २० वर्षांत धरणाचा ठेकेदार आमदार होतो. मात्र त्याच ठेकेदारानं बांधलेलं धरण मात्र फुटतं आणि अनेकांचा जीव घेतं. 

तिवरे भेंडेवाडी धरण दुर्घटनेसाठी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. धरणाची डागडुजी योग्य प्रकारे केली नसल्यामुळे धरण फुटल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. कोकणातल्या धरणांमध्ये काळ्या मातीचा वापर न केल्यामुळे धरण फुटल्याचं निवृत्त अभियंते विजय पांढरे यांनी म्हटलं आहे.

तिवरे धरणाचं काम हे खेमराज कंपनीनं कन्स्ट्रक्शनने केलं असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे. याठिकाणी काही ग्रामस्थांनी या बाबत आरोप केला आहे की, धरण फुटण्यामागे ठेकेदार देखील दोषी आहे. त्याच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी स्थनिक करत आहेत.