नाशिक : महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मोठे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे. मंत्रिमंडळातल्या सहा मंत्र्यांना कोरोनाचीलागण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021
महत्त्वाचं म्हणजे कालच एका लग्न सोहळ्यात भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. याआधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री बच्चू कडू आणि एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं होतं. मंत्रिमंडळातील तब्बल 6 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढत आहेत.
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळा आज नाशिक येथे पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks यांच्यासमवेत वधू वरांना शुभेच्छा दिल्या व भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या. pic.twitter.com/Fy8wOXgBkp
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 21, 2021
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. अनलॉकनंतर नागरिक बेफिकीर झाल्याचं चित्र आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. नागरिकांचा विनामास्कचा वावर दिसून येतोय. नागरिक बिनधास्त असल्याचं दिसून येत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. पालिकेने मास्क न लावणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी स्पेशल मार्शल नेमले आहेत. तसंच आता त्यांच्या मदतीला पोलीसही कारवाई करताना दिसत आहेत.
याआधी राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना केंद्राने केली आहे. मार्च महिन्यापासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचं काम करावं लागेल असं सुचवण्यात आलं आहे. अजूनही अनेक राज्यात आरोग्य आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलेली नाही. आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवा, पन्नाशीवरील व्यक्तींचं लसीकरण करा अशी सूचना करण्यात आली.