प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : तिवरे धरणाजवळ राहणाऱ्या एका तरुणाला पुढे काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज आला होता. म्हणूनच त्यानं धरणाबद्दल आधीपासून पत्रव्यवहार करायला सुरुवात केली होती.
अजित अनंत चव्हाण याने तिवरे धरणाच्या दुरवस्थेबाबात सरकारी यंत्रणेशी पत्रव्यवहार केला, त्यालाच आज स्वतःचे वडील, भाऊ, वहिनी आणि दीड वर्षाच्या पुतणीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. धरणाशेजारीच चव्हाण यांचं घर आहे. धरण फुटल्यावर अजितच्या घरातले हे पाचही जण वाहून गेले.
अजित आणि त्याचा चार वर्षांचा पुतण्या चिपळूणला राहतात, म्हणून दोघे वाचले. अजित चव्हाणनं या धऱणासंदर्भात फेब्रुवारीत लिहिलेलं पत्र चिपळूण उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला पाठवलं आणि पाटबंधारे विभागानं मे महिन्यात पडलेल्या भगदाडाला मलमपट्टी केली. पण ही तात्पुरती मलमपट्टी कुचकामी ठरली. काहीतरी अनुचित घडेल याची भीती अजितला होती, म्हणूनच त्यानं ते टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अखेर त्याच्याच घरातले ५ बळी गेले.