शिर्डी : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने आज सहपरिवार शिर्डीत साईचरणी दर्शन घेतलं. दुपारच्या सुमारास सचिन, साई दरबारी येणार असल्याची चर्चा शिर्डीत सुरु झाल्यानंतर, मंदिर परिसरात सचिनला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सचिन साईमंदिरात जातांना आणि बाहेर आल्यानंतरही चाहत्यांनी सचिन-सचिन अशा जोरदार घोषणाही केल्या.
सचिन, त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन हे तिघेही आपल्या काही मित्रपरिवारासोबत आज दुपारी खासगी विमानाने शिर्डीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी साईमंदिरात साईंचं दर्शन घेत, साईंची पाद्य पुजाही केली.
साईबाबा संस्थानच्यावतीने कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सचिनचा शाल आणि साईंची मुर्ती देऊन सत्कार केला. शिर्डीकरांच्यावतीने नगाराध्यक्ष अर्चना कोते यांनी साईबाबांची प्रतिमा देऊन सचिनचा सत्कार केलाय.
सचिन गेल्या दहा वर्षानंतर आज शिर्डीत दाखल झाला होता. सचिन शिर्डीत आल्यानंतर साईभक्त तसेच सचिनच्या चाहत्यांनी त्याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सचिनला सुरक्षा पुरविण्यासाठी पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.