मुंबई : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
राज्यातील विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गदारोळ पहायला मिळाला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, वीजबिले, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोव्हिड केअर सेंटरमधील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण इत्यादी कारणांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संघमुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. संघमुख्यालयात भागवत आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्येही भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला होता. त्यामुळे पक्ष वरिष्ठांचा त्यांच्यावर चांगला विश्वास आहे. सरसंघचालकांच्या भेटीत काय काय चर्चा झाली याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु आगामी काळात या भेटीत काय दडलंय याबाबत माहिती समोर येईलच. सध्यातरी फडणवीस आणि सरसंघचालकांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.