'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'

Manoj Jarange Patil Slams Devendra Fadnavis: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 1, 2023, 09:28 AM IST
'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...' title=
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली टीका

Manoj Jarange Patil Slams Devendra Fadnavis: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जाळपोळ करणाऱ्यांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. तसेच राज्य सरकारच्या आदेशावरुन जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली जात असल्याचे मेजेस टेलिफोन ऑप्रेटर्सकडून ग्राहकांना येत असल्याच्या मुद्द्यावरुन जरांगेंनी ही टीका केली.

तुमचेच लोक घुसवून जाळपोळ

देवेंद्र फडणवीस यांनी केसेस दाखल करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर तसेच इंटरनेट बंदीच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. गृहमंत्र्यांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल केले जातील अशा अर्थाने पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना “त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं? एवढंच आलं. यांनी उभ्या आयुष्याच एवढंच केलं. कोण टार्गेट केलं आणि कुणी कुणाची घरे जाळली, कशाला बोलगा मग आम्हाला? ती कुणी जाळली, मराठ्यांनी जाळली की दुसरं कुणी जाळलं? तुमचेच लोकं घुशविता आणि तुम्हीच जाळीता. तुम्ही आम्हाला शिकविता”, असं मनोज जरांगे म्हणाले.

बढाया हाणणारे नमुने

“भाजपा तुमच्यामुळेच संपायला लागली आहे ना मग, कशामुळे संपायला लागली आहे? रिवाज कशामुळे इतक्या राज्यात आलेत? हे असले नमुने आहेत ना बढाया हाणणारे. निधी आमचा आहे. कर आमच्या जनतेचा आहे. फुकटचे पैसे खायचे. बासुंद्या खाय, गुलाबजामून खाय. फुकट खायचं, आता सूचना. उगाच बोलायचं की कलम 307 लागू करायचं. तुम्ही राज्यात अशांतता पसरवायचं ठरवलं आहे तर करा तुम्हाला काय करायचं ते. आमचा मराठ्यांचा नाईलाज आहे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहू. नाहीतर पाणी सोडणार. आमचं आंदोलन शांततेत करु. तुम्ही किती ताकवान आहात, किती गुन्हे दाखल करतात ते आम्हाला बघायचं आहे”, असं मनोज जरांगे यांनी फडणवीस यांचा थेट उल्लेख न करता म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> संतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'

एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची लय सवय

जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सेवा रिस्टोअर करताच आम्ही तुम्हाला कळवू. असे मेसेज टेलिफोन नेटवर्क ऑप्रेटर्सकडून येत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना “सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठे नेट बंद करता तर कुठे काय बंद कर. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर आम्हालासुद्धा मर्यादा आहेत. आम्हाला आमच्या मर्यादा सोडाव्या लागणार आहेत आणि याला जबादार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असणार आहेत. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला असल्या काड्या करायची लय सवय आहे”, अशा बोचऱ्या शब्दांमध्ये मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

नक्की वाचा >> ...तर अजित पवारांना रुग्णालयात दाखल करणार; 101 ताप, प्लेटलेट्सचा उल्लेख करत डॉक्टरांची माहिती

सरकारमध्ये रंगेबिरंग आणून ठेवले

"आम्ही शांततेत आहोत. पण आम्ही वस्ताद आहोत. आम्ही ओबीसी नेत्यांच्या धमक्यांना घाबरायला तयार नाहीत. आमचं खाल्लं तोवर गोड लागायचं. आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर येईल. ये तर रस्त्यावर. तुला कोणत्या सरकारची फूस आहे. एक उपमुख्यमंत्री लयी कलाकार आहे. त्याच्याकडे बघावं लागेल. बाळा तू लोकांना थांबव. तू राज्य बिघडवू नको. एकतर सर्व भाजपा विद्रुप केलं. सरकारमध्ये रंगेबिरंग आणून ठेवले आहेत," असं मनोज जरांगे पाटील यांनी सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारला लक्ष्य करताना म्हटलं आहे.