ऐन पाणी टंचाईत केवळ आसुयेपोटी विहिरीत कालविले विष

विहिरीच्या पाण्यात विषारी औषध टाकून पाणी खराब करून माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार

Updated: May 18, 2019, 08:00 AM IST
ऐन पाणी टंचाईत केवळ आसुयेपोटी विहिरीत कालविले विष  title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना  केवळ सूड घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विष  कालविल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या  नांदगाव तालुक्यातील  साकोरा गावात ही घटना घडली आहे.  पाणी टंचाईमुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे भीषण वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. 

राज्यावर सध्या पाणी टंचाईचे संकट आहे. नाशिकच्या नांदगाव आणि मनमाड परिसरात तर पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर विहिरींनी तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी महिला आणि आबालवृद्धांना पायपीट करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी पिण्यासाठी साठवून ठेवले आहे. त्यावर ते स्वत:सोबत जनावरांची तहान भागवतात. नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील शेतकरी  शांताराम बोरसे यांनी आपल्या मालकीच्या विहिरीत पिण्यासाठी पाणी साठवून ठेवले होते. मात्र अज्ञात समाज कंटकांनी केवळ आसुयेपोटी चक्क विहिरीच्या पाण्यात विषारी औषध टाकून पाणी खराब करून माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे. 

शांताराम बोरसे नेहमीप्रमाणे विहिरीवर पाणी आणण्यासाठी बोरसे विहिरी गेले असता  विहिरीचे पाणी दूषित झाल्याचे लक्षात आले. विषारी औषधांचे रिकामी डब्बे विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसले. विशेष म्हणजे पाण्याला   दुर्गंधी येत होती तसेच पाण्यातील जीवजंतू मृत अवस्थेत आढळून  आले. त्यामुळे  पाण्यात अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा बोरसे यांनी  ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी नांदगाव पोलिसात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पाण्यात विष टाकणाऱ्या शोध घेतीलही पण पाणीटंचाईमुळे माणूसकी लयास जात असल्याची भावना काही गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.