मांजरा धरणात अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा

लातूरमध्ये दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Updated: Jul 28, 2019, 08:08 PM IST
मांजरा धरणात अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : एकीकडे महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस, पूरस्थिती निर्माण झाली असताना तिकडे लातूरवर मात्र पाणीसंकट घोंगावत आहे. मराठवाड्यावर वरुणराजा रुसलाय. लातूरमध्ये यंदा गंभीर पाणीबाणी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. 

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ दोन ते अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मांजरा धरण परिसरात पाऊस झाला नाही तर लातूरला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एप्रिल-२०१६मध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. सांगलीतील मिरजेवरून हे पाणी लातूरला आणण्यात आले होते. आता पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. 

दुसरीकडे येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडेल आणि त्यामुळे रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही असे लातूरचे पालकमंत्री म्हणाले आहेत.

कायम दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या लातूरवर पुन्हा एकदा रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ नये अशीच प्रार्थना लातूरच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.