सोलापूर : परतीचा पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. उजनी धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले आहे. तसेच वीर धरणांमधूनही भीमा नदीमध्ये पाणी सोडले आहे. यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळते. याचा फटका शेतीला बसला आहे.
परतीच्या पावसाने पंढरपूर परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी सकाळी पर्यंत पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. उघड्यावर वाळण्यासाठी ठेवलेला कांदा पूर्ण पणे पावसात भिजला आहे. गाळपासाठी तयार असलेला ऊस शेतात पडला आहे. डाळींबरोबरच द्राक्ष बागाचे सुध्दा अधिक नुकसान झाले आहे. अजून काही दिवस पावसाचा इशारा असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे खळखळून वाहत आहेत. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न मिटला तरी यंदा बहरून आलेल्या पिकांचं परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पीक भिजली होती. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी पीक काढून शेतात झाकून ठेवली होती. परत मागील तीन दिवसात पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे काढून ठेवलेलं पीक नेता येत नाही. त्यामुळे सोयाबीन सारखे पीक काळे पडण्याची भीती आहे.
मात्र या पावसामुळे रब्बीच्या पिकाला फायदा होणार आहे. आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे उमरगा तालुक्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे तर उमरगा शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढील दोन तीन दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.