Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरचा (Samruddhi Highway Bus Accident) आजवरचा सर्वात मोठा आणि मन सून्न करणारा अपघात घडला आहे. डिव्हायडरला धडकून बसने पेट घेतला. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूरहून पुण्याकडे ही बस जात असून मध्यरात्री 1.30 ते 2च्या सुमारास हा अपघात घडला आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताचे कारण सांगितले आहे. (Samruddhi Highway Bus Accident)
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावानजीक समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्यामुळं हा अपघात घडला आहे. महामार्गावर बस सर्वात आधी दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाल्याची माहिती समोर येते. या अपघातात बसचा एक ड्रायव्हर बचावला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बस दुभाजकाला धडकल्यानंतर बसमधील डिझेल टँकला धडक बसली त्यानंतर टँक फुटल्याने मोठा स्फोट झाला त्यातच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा असलेल्या ठिकाणीच आग भडकल्याने प्रवाशांना तिथून बाहेर पडण्यास संधीच मिळाली नाहीये. तसंच, रात्रीची वेळ असल्याने बहुंताश प्रवासी हे झोपेत होते. त्यामुळं त्यांना बाहेर पडता आलं नाही.
बसने पेट घेतल्यानंतर जवळपास दीड ते दोन तास अग्नितांडव सुरू होतं. मात्र रात्रीची वेळ असल्याने वेळेत मदत मिळाली नाही. बसने पेट घेतल्यानंतर काही प्रावाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर धाव घेतली. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसच्या कॅबिनमध्ये काही प्रवासी बसले होते. त्यामुळं हे अपघातात सात जण बचावले आहेत. यातील एक ड्रायव्हर बचावला आहे तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. त्यातील 25 जणांचा मृत्यू झाला असून ८ जण बचावले आहेत. या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून अपघाताबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान, अपघातातील मृतांना महाराष्ट्र सरकारकडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.