Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवामान बदल होताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक असलेली पावसाची हजेरी अनेकांचं जगणं बेजार करून गेली आहे. तर, भरीला आलेल्या शेतपिकांची नासाडी झाल्यामुळं बळीराजापुढे नवं संकट उभं राहिलं. (maharashtra weather Unseasonal Rain heat wave will slow down all india climate latest update )
बुधवारीसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. महाबळेश्वर, पातगणी आणि साताऱ्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली. तर, परभणी- जिल्ह्यालाही पुन्हा अवकाळीनं झोडपून काढलं. पूर्णा, मानवत पाथरी सेलू या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यामुळं ज्वारी, आंबा , हळद या पिकांचं नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.
विदर्भासह राज्यातील बहुतांश भाग आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्हायत उन्हाचा तडाखा मागील दोन दिवसांपासून वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात राज्यातील विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपुरातील ब्रह्मपुरीत पारा 43.8 अंशांवर पोहोचला होता. सकाळी 9 वाजल्यापासून तापमानामध्ये होणारी वाढ आणि उन्हाच्या झळा पाहता सध्या अनेक भागांमध्ये या वेळी रस्त्यांवर असणारी वर्दळही कमी झाली आहे.
वाशिम, अमरावती आणि अकोल्यातही तापमान 42 अंशावर पोहोचलं आहे. इथं मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागातही तत्सम परिस्थिती पाहायला मिळत आहे. कडाक्याचं ऊन आणि मध्ये ढगाळ वातावरण ही अशी एकंदर परिस्थिती असल्यामुळं सध्या नागरिकांच्या आरोग्यावरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.
तापमान वाढ सध्यातरी काही पाठ सोडणार नाही, असा इशारा असतानाच राज्याच्या काही भागांत अवकाळीची हजेरीही दिसणार आहे. इतकंच नव्हे, तर 20 एप्रिलपासून पुढील 4 दिवसांसाठी कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची घट होईल अशी माहिती हवमान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली. त्यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे.
19/04, Central & W India:
Fall in Tmax by 2-4° frm 20th for 4 days
Konkan-Goa:Heat wave conditions vry likely in isol places on 19
Light/mod isol rains with TS/lightning/gusty winds vry likly over MP, Vidarbha, Ch'garh in nxt 5 days
Isol hailstorm likly ovr Vidarbha Ch'garh on 20— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 19, 2023
राज्यातील तापमानात घट होणार असली तरीही उष्णतेचा दाह मात्र अनेक अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.