Maharashtra Weather News : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच महाराष्ट्रातून पावसानं काहीशी माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. अधून मधून येणारं पावसाळी ढगांचं सावट आणि रिमझिम पाऊस वगळता इतर कुठंही पावसाचा लवलेषही पाहायला मिळाला नाही. उलटपक्षी विदर्भापासून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही पावसानं उसंत घेत या सर्वच भागांमध्ये तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये हवेतील आर्द्रता वाढली, तर कुठं उष्ण वाऱ्यांनी अडचणी वाढवल्या.
सध्या पुढील काही दिवस हे उष्ण वारे आणखी त्रास देताना दिसणार असंच हवामान विभागानं स्पष्ट केलं असून, विदर्भ आणि काही भागांमध्ये आता पाऊस पुन्हा वातावरणनिर्मिती करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या विश्लेषणानुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, मुंबईत काही ठिकाणी ढगांची दाटी वदळता इतर भागांमध्ये आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरांतील तापमानाचा आकडा सरासरी कमाल आणि किमान अनुक्रमे 33 आणि 26 अंश सेल्सिअस इतका राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत काही ठिकाणी हल्का पावसाची नोंद झाली आहे.
Mumbai recorded light rainfall at few places in the last 24 hours. pic.twitter.com/mmLvoIVx88
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 16, 2024
देशातील हवामान प्रणाचीचा अंदाज घ्यायचा झाल्यास सध्या बांगलादेशचा दक्षिण भाग आणि पश्चिम बंगालमध्ये वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळं या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. हे क्षेत्र येत्या दिवसांमध्ये आणखी वाढणार असून, राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत त्याचा प्रभाव दिसून येणार आहे. ज्यामुळं पुढील पंधरा दिवसांमध्ये देशात आणि राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस जोर धरताना दिसेल.