Maharashtra Weather News : राज्यातील कोकण (Konkan), मुंबई (Mumbai) आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह कर्नाटकापर्यंत (Karnataka) वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळं या भागांमध्ये तापमानाचही चढ- उतार नोंदवण्यात येत आहेत. तर, काही भागांवर ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही पावसाची हजेरी मात्र राज्याच्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पट्ट्यातच थैमान घालताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान इथं ताशी 30-40 किमी वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
बीड, लातूर, उस्मानाबाद, सांगलीतील दुर्गम भाग, परभणी आणि सोलापूर या भागांसह मध्य महाराष्ट्रातही ढगांच्या गडगडाटाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांवर ढगांची चादर असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी होणार नसल्याचंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Thunderstorm developments over parts of Madhya Maharashtra and Marathwada today :
Beed, Latur, Osmanabad, isolated parts of Sangli, Parbhani & Solapur district. pic.twitter.com/74yad4EK42— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 11, 2024
राज्यात सुरु असणाऱ्या अवकाळीच्या सावटामुळं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, नांदेड, हिंगोलीमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, धागाशिव, लातूरमध्येही वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.