मुंबईची होरपळ, कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; मान्सून राहिला कुठे?

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत असून, कुठं तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळतेय.  

सायली पाटील | Updated: May 24, 2024, 10:11 AM IST
मुंबईची होरपळ, कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; मान्सून राहिला कुठे? title=
Maharashtra Weather News monsoon latest update rain Mumbai to vitness heatwave

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) राज्यातील आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले असले तरीही मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस, मधूनच दाटून येणारे ढग असं एकंदर वातावरण मात्र चकवा देऊन जात आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह वाढताना दिसत आहे. विदर्भात जिथं एकीकडे अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे त्याच विदर्भात दुसरीकडे तापमान चाळीशीपलिकडे जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईतही चित्र वेगळं नाही. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं इथं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत आहे. शहरात तापमानाचा आकडा जास्त नसला तरीही त्या तापमानाचा दाह मात्र अधिक असल्यामुळं घामाच्या धारा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच शहराच्या काही भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं अधिकच कोंडी होताना दिसत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये शहरातील वातावणारत फारसे बदल अपेक्षित नाहीत. मात्र दिवस मावळतीला जात असताना ढगांची दाटी मात्र पावसाची चिन्हं दाखवून जाऊ शकते. असं असलं तरीही मुंबई आणि उपनगरावर, थोडक्यात महाराष्ट्रावर अद्याप मान्सूनची कृपा नाही ही वस्तूस्थिती. शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान कोरडं असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मात्र हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कुठे राहिला मान्सून? 

मागील 48 तासांपर्यंत मान्सूननं श्रीलंकेपर्यंतचा प्रदेश व्यापला असून, पुढं मात्र त्याची फारशी उत्तम प्रगती होऊ शकलेली नाही. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत त्यानं मालदिव, कोमोरिनचा काही भाग, आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला होता. पण, बुधवारनंतर मात्र मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावताना दिसला.

हेसुद्धा वाचा : मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद

दरम्यान, पुढील 48 तासांमध्ये मान्सून किमान वेगानं बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापणार असून, निकोबार बेटासह श्रीलंकेच्याही बहुतांश भागांमध्ये प्रगतीशील वाटचाल करताना दिसेल. तिथं मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावल्यामुळं भारतात आणि प्रामुख्यानं दक्षिण भारतासह महाराष्ट्रात उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.