Maharashtra Weather News : कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सून सरींमुळं तापमानात दिलासादायक घट; मुंबई कधी सुखावणार?

Maharashtra Weather News : मान्सून येणार म्हणता म्हणता मान्सून आता अखेर आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सूननं हजेरी लावली असून, तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.  

सायली पाटील | Updated: Jun 7, 2024, 06:54 AM IST
Maharashtra Weather News : कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सून सरींमुळं तापमानात दिलासादायक घट; मुंबई कधी सुखावणार?  title=
Maharashtra Weather News Monsoon hits konkan and central maharashtra results in temprature drop

Maharashtra Weather News : तापमानाचा आकडा 45 अंशांपुढं जाऊ लागला तसतशी राज्यातील परिस्थिती आणखी बिघडू लागल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड उकाड्यामुळं राज्यातील जनता त्रस्त झालेली असतानाच अखेर नेऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची चिन्हं स्पष्ट दिसली आणि या आनंदाच्या बातमीनं अनेकजण सुखावले. मोठा प्रवास करत अखेर केरळमार्गे हा मान्सून आता महाराष्ट्रात दाखल झाला असून, त्याची प्रतीक्षा संपली आहे. पण, राज्यातील काही भाग मात्र यास अद्यापही अपवाद ठरताना दिसत आहे. 

तापमानात दिलासादायक घट 

मान्सूनसरींमुळं राज्याच्या (Konkan) कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात दिलासादायक थंडावा असून, तापमानाची ही घट सुखद अनुभव देऊन जात आहे. दरम्यान, राज्याच्या (Vidarbha) विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागाला मात्र अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा असून, इथं मान्सूनपूर्व सरी वातावरणनिर्मिती करताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्याच्या घडीला मान्सून (Monsoon) कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह सोलापुरातही दाखल झाला आहे, त्यामुळं या भागांमध्ये तो पुढील 48 तास तघ धरून राहील असा अंदाज देण्यात आलाय. शनिवारपासून मान्सूनची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून तळकोकणात यंदा एक दिवस आधीच दाखल झाल्यामुळं मुंबईतही त्याचं आगमन ठरलेल्या तारखेआधी झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

हेसुद्धा वाचा : महाराष्ट्राचा हिम्मतगड... महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते 'त्या' संगमावर असेलला बाणकोट किल्ला

 

सध्या गोवा किनारपट्टी (Goa) क्षेत्रामध्ये अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्याच्यामुळं मान्सूनच्या वेगवान वाटचालीला आणखी वाव मिळताना दिसत आहे. ज्यामुळं येत्या काळात मुंबई, कोकणासह पश्चिम घाट परिसरामध्ये जोरदार पर्जन्यमानाचा अंदाज आहे. येत्या काळात मान्सून राज्याच्या विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

मान्सून कुठपर्यंत पोहोचला? 

गुरुवारी मान्सूननं महाराष्ट्रात सोलापूरपासून रत्नागिरीपर्यंतचा टप्पा गाठला असून, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील इतर काही भागांपर्यंत मजल मारली. गुरुवारी मान्सूनचा बहुतांशी प्रभाव रत्नागिरी, सोलापूर, विजयानगरम भागात दिसून आला. पुढील 3 ते 4 दिवसात हाच मान्सून कर्नाटकच्या बहुतांश भागासह छत्तीसगढ, तेलंगणा, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात प्रगती करताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.