Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी होताच तापमानात वाढ; लक्षपूर्वक वाचा हवामान वृत्त...

Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात वाढ झाली असून, पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं हे बदल नोंदवण्यात आले आहेत.   

सायली पाटील | Updated: Oct 1, 2024, 07:15 AM IST
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी होताच तापमानात वाढ; लक्षपूर्वक वाचा हवामान वृत्त...  title=
Maharashtra Weather news light to moderate rain in southern region

Maharashtra Weather News : परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून वाटेत आलेल्या काही अडथळ्यांमुळं धीम्या गतीनं प्रवास करताना दिसला. ज्यानंतर सोमवारपासून पुन्हा एकदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासानं वेग धरल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना या प्रवासाला आणखी वेग मिळण्याचे संकेत असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. 

पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या दक्षिणेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच धर्तीवर या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण पट्टा वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देणार असून, हलकी रिमझिम वगळता कुठंही मुसळधार पावसाचा इशारा नाही. 

राज्यात पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र असल्यामुळं बहुतांश भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानाच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं अगदी महिन्याच्या पहिल्य़ाच दिवसापासून 'ऑक्टोबर हिट'चे संकेत मिळताना दिसत आहेत. राज्यात सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्र, सातारा, सांगली आणि बीड या भागांमध्ये पावसाच्या सरींची अधूनमधून हजेरी पाहायला मिळू शकते. पण, कुठेही त्या अडचणींमध्ये भर टाकताना दिसणार नाहीत. 

यंदा मान्सूनची सरासरीहून 8 टक्के जास्त हजेरी... 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी भारतात 934.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सरासरीच्या 108 टक्के पाऊस झाल्याचं यातू निष्पन्न झालं असून, 2020 नंतरचं हे सर्वाधिक पर्जन्यमान ठरलं आहे. आयएमडीच्या माहितीनुसार मध्य भारतात सरासरी 19 टक्के पाऊस झाला. तर, पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातही सरासरीहून 14 टक्के जास्त पाऊस झाला. देशात यंदा जून महिन्यात 11 टक्के कमी पाऊस झाला खरा, पण जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण वाढल्याचं लक्षात आलं. 

हेसुद्धा वाचा : महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

 

2022 मध्ये 925 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. ही आकडेवारी सरासरीच्या 106 टक्के इतकी होती. तर, 2021 मध्ये 870 आणि 2020 मध्ये 958 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदाच्या वर्षीचं पर्जन्यमान पाहता पावसानं समाधानकारक कामगिरी केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.