ऑगस्टमध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक उकाडा; पाऊस नेमका कधी परतणार? राज्यातील पर्जन्यमानाविषयीचा मोठा इशारा

Maharashtra Weather News : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं उसंत घेतली असून, लख्ख सूर्यप्रकाशामुळं आता अनेक भागांमध्ये कमाल तापमानाच वाढ होताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 23, 2024, 07:47 AM IST
ऑगस्टमध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक उकाडा; पाऊस नेमका कधी परतणार? राज्यातील पर्जन्यमानाविषयीचा मोठा इशारा  title=
Maharashtra Weather news hottest day in august recorded in mumbai latest updates

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता येत्या काही दिवसांमध्ये परतणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं पुन्हा एकदा पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या कोकण पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तर, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 

दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वातावरण अंशत: ढगाळ राहणार असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 आणि 24 अंश सेल्सिअस इतकं असेल. 

ऑगस्ट महिन्यात मुंबईत विक्रमी उकाडा... 

मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र हा पाऊस संपूर्ण राज्यातच लपंडावाचा खेळ खेळताना दिसला. दरम्यानच्या काळात सूर्यकिरणांनी बहुतांश जिल्हे न्हाऊन निघाले आणि अनेक ठिकाणी तापमानाचा आकडाही वाढता. किनारपट्टी भागांमध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढत असल्यामुळं उकाडा प्रमाणाहून जास्त भासत असल्याचं जाणवलं आणि हवामानाच्या या स्थितीनं अनेकांनाच घाम फोडला. 

हेसुद्धा वाचा : 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'

गुरुवारी मुंबई शहरात 33.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत नोंदवण्यात आलेलं हे सर्वाधिक तापमान ठरलं. यापूर्वी मुंबईत 1969 मध्ये 26 ऑगस्ट या दिवशी 33.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईत मान्सूननं घेतलेली विश्रांती ही या तापमानवाढीमागचं मुख्य कारण सांगण्यात येत आहे. तेव्हा आता शहरात पाऊस नेमका कधी परततो आणि या उकाड्यापासून नागरिकांची सुटका कधी होते? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

शनिवार रविवार पावसाचा.... 

हवामान खात्याच्या माहितीनुसार शनिवार रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला देखील मुसळधार पाऊस पडणार असून, ठाण्यासह रायगडला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.