Maharashtra Weather News : जून महिन्याच्या अखेरीपासून सुरु असणाऱ्या पावसानं काही दिवसांची विश्रांती वगळली तर महाराष्ट्रात चांगलाच मुक्कान ठोकला आहे. कोकणापासून घाटमाध्यापर्यंत आणि विदर्भापर्यंतसुद्धा या पावसानं त्रेधातिरपीट उडवली असून, आता तरी या वरूणराजानं उसंत घ्यावी अशीच आर्जव अनेकजण करताना दिसत आहेत. पण, राज्यात मोठ्या मुक्कामासाठी आलेल्या या पावसाचा मनसुबा मात्र तसा दिसत नाही.
हवामान विभागानं राज्यावर सध्या असणारी ढगांची रचना आणि हवामानाची एकंदर स्थिती पाहता वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काळात राज्याच्या किनारपट्टी भागासह घाटमाथ्यावर सोमवारीसुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
झारखंडच्या उत्तरेला अति तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, आता ते ईशान्य मध्य प्रदेशावर सक्रिय आहे. येत्या 12 तासांमध्ये या प्रक्रियेला आणखी तीव्रता प्राप्त होणार असून आहे पुढं ती कमी ही होणार आहे.
तिथं समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय आहे. या संपूर्ण प्रणालीमुळं पुढील 24 तासांमध्ये महापराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. यामध्ये पुणे आणि सातारा सर्वाधिक प्रभावित क्षेत्र राहणार असून, डोंगराळ भागांमध्ये दाट धुक्यामुळं दृश्यमानता कमी राहील. तसंच, दरडप्रवण क्षेत्रांमध्येही दक्षता घेण्याची गरज उदभवताना दिसेल.
गेल्या 24 तासांपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. हवामान विभागाने घाट माथ्यावर दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यानुसार पावसाची तुफान बॅटिंग सुरूये. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पावसाची नोंद झालीय. तिथं पुण्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यात गेल्या 24 तासांपासून अति मुसळधार पाऊस कोसळलाय. पावसामुळे परिसरातील अनेक धरणं ओव्हरफ्लो झालीये.. शेतक-यांचा वर्षभराचा पाणी प्रश्नही मिटला आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर, कर्जत, पनवेल, माथेरानमध्ये पावसाचा कहर दिसून येतोय. खोपोलीत संततधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. खोपोलीतील डी सी नगर, कार्मेल स्कूल, लौजी, चिंचवली भागात पाणी साचल्यामुळे नागरिक हैराण झालेत.