Maharashtra Weather News : दिवसाच्या 24 तासांमध्ये हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांची नोंद मागील काही दिवसांपासून हवामान विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. याच धर्तीवर जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार आणि हवामान वृत्तानुसार श्रावणमहिन्याचा प्रारंभ होताच राज्यातील हवामानानं चेहरामोहरा बदलला आहे. मागील 48 तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर, काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी रौद्र रुप दाखवू लागल्या आहेत.
विदर्भासह राज्याच्या कोकण आणि घाटमाथ्यांवरील भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, पुढील 24 तासांसाठी इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 25°C च्या आसपास असेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव आणि ऊन्हाची ये - जा नेमकी का सुरू आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सातत्यानं बदलणारी हवामान प्रणाली. सध्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानच्या दिशेनं सरकला असून, काही प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तिथं दक्षिण गुजरात ते केरळपर्यंतही किनाऱ्यालगतच्या भागात एक सौम्य कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात ऊन- पावसाचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात एकिकडे पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरीही घाटमाथ्यांवर मात्र कोसळधारेचा मारा सातत्यानं सुरू राहणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, नाशिक, सातारा, सांगलीसह राज्याच्या इतरही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचीच हजेरी असून राज्याच तापमानाचा आकडा वाढल्याचं निदर्शनास येईल. ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण पाहता फार कमी भागांमध्ये पाऊस सरासरीहून पुढचा आकडा गाठेल. त्यामुळं ऑगस्ट महिन्यात आर्द्रतेचं प्रमाणही जास्त राहणार असून, उष्णतेहा दाह जाणवण्याची शक्यता आहे.