उत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम?

Maharashtra Weather News: फेब्रुवारी महिन्यामध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याला इशारा हवामान विभागानं दिला होता. हाच इशारा आता प्रत्यक्षात अनुभवता येत आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 5, 2024, 03:12 PM IST
उत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम?  title=
Maharashtra weather news Cold wave differ from regions snowfall continues in north india latest updates in marathi

Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढत आहे. तर, काही भागांमध्ये मात्र मैदानी क्षेत्रांवर अवकाळी पावसाची बरसातही पाहायला मिळत आहे. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, मधूनच येणारा लख्ख सूर्यप्रकाश आणि रात्रीच्या वेळी वाढणारा थंडीचा कडाका असं एकंदर हवामानाचं चित्र असल्यामुळं सध्या त्याचे सर्वदूर परिणाम पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडील राज्यांच्या तापमानाच होणारे चढ- उतार महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा लपंडाव सुरु झाला आहे. 

मुंबईमध्ये सकाळच्या वेळी असणाऱ्या प्रखर सूर्यप्रकाशामुळं सूर्याचा दाह दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर, रात्रीच्या वेळी मधूनच शहरातील तापमानाचा पारा मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत तापमान 14 ते 24 अंश इतकं राहण्याची शक्यता आहे. तर, पाचगणी, महाबळेश्वर, नाशिक आणि माथेरानमध्ये मात्र गुलाबी थंडी कायम राहणार आहे. मराठवाड्यात थंडीचं प्रमाण काही अंशी कमी राहणार असलं तरीही ही थंडी इतक्यात राज्यातून काढता पाय घेत नाही हे मात्र स्पष्ट होत आहे. 

काश्मीर, उत्तराखंडवर बर्फाची चादर 

उत्तराखंडसह जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशात सध्या हवामानानं अतिशय सुरेख रुप दाखवलं असून, इथं येणारे पर्यटकही या राज्यांमधील हिमवृष्टी पाहून भारावले आहेत. दरम्यान, येत्या 48 तासांमध्ये या राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर उत्तरेकडे असणाऱ्या या राज्यांमध्ये धुक्याचं प्रमाणही जास्त असल्यामुळं हवाई वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसय़णार आहेत. 

हेसुद्धा वाचा : मुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान  

उपलब्ध माहितीनुसार अधिक प्रमाणात हिमवृष्टी झाल्यामुळं श्रीनगर विमानतळातील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर, जम्मूतील रामबन भागामध्ये भूस्खलनाची घटना घडल्यामुळं तब्बल 270 किमी अंतराच्या जम्मू श्रीनगर राष्ट्रीय मगामार्गावरील वाहतूक साधारण चार तासांसाठी बंद करावी लागली. 

हिमाचलच्या किन्नौर, किलाँग, सांगला तर, उत्तराखंडच्या बद्रीनाथ, केदारनाथसह या राज्याच्या मैदानी क्षेत्रांमध्येसुद्धा तापमानाचा पारा बऱ्याच अंशी खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. देशाच्या उत्तरेकडे वाढणारा थंडीचा हा कडाका पाहता या शीतलहरी महाराष्ट्रावरही परिणाम करताना दिसणार हे नाकारता येत नाही.