Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळीच्या सत्रानं मागील काही दिवसांपासून नागरिक आणि शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या केल्या. ऐन मे महिन्यात सुरु असणाऱ्या या अवकाळीमुळं शेतपिकांचं नुकसान तर झालंच. शिवाय (Monsoon) मान्सूनही लांबणार का असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र काही वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण, मुंबई (Mumbai), पुणे (Pune), कोकण किनारपट्टी (Konkan) आणि राज्याच्या उर्वरित भागामध्ये उष्णतेचा दाह (heat wave) वाढू लागला.
काही भागांमध्ये आर्द्रतेचं (Humidity) प्रमाण जास्त असल्यामुळं तापमान दोन अंशांनी जास्त असल्याचं मागील दोन दिवसांमध्ये जाणवलं. थोडक्यात राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा तापमान वाढील सुरुवात झाली असून, पुण्यात हा आकडा 40 अंशांच्या वर राहील. तर, मुंबईमध्ये 36 ते 38 अंश सेल्सिअसदरम्यान राहील.
मागील 24 तासांमध्ये अंदमान आणि निकोबार बेट समुहामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी बरसल्या. तर, केरळ, तामिळनाडू, आणि पूर्वोत्तर भारतामध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. सिक्कीम, दक्षिण छत्तीसगढ आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागाला या पावसानं ओलंचिंब केलं.
#Tmax #forecast for 12 May 2023.
Parts of madhya #Maharashtra, adj #marathwada & #Vidarbha will experience Tmax 42-45 Deg C as per IMD GFS model guidance.#Pune ~40+#Mumbai around could be 36-38
TC pl pic.twitter.com/6ezzvMPY9Q— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2023
येत्या काळातील हवामानाचा अंदाज सांगायचा झाल्यास पुढील किमान दोन दिवस अंदमान आणि बंगालच्या उपसागरानजीकच्या प्रदेशात हवामान बिघडलेलं असेल. समुद्रात उंच लाटा उसळतील, ताशी 70 ते 80 किमी वेगानं वारे वाहतील. कर्नाटकचा किनारपट्टी भाग, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पावसाची हजेरी असेल. तर, महाराष्ट्रातील काही भागात हवामान अंशत: ढगाळ असेल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यांनी रौद्र रुप धारण केलं असून, त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. यामध्ये वादळी वारे चक्रिवादळामध्ये रुपांतरित झाले असून, 12 मे रोजी ते आणखी रौद्र रुपातच पुढे जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 12 मे रोजी दुपारनंतर चक्रिवादळ उत्तर- पुर्वेला वळणार असून, त्यानंतर त्याचा पुढील प्रवास सुरु होईल. जिथं ते बांगलादेशचा पूर्व भाग आणि म्यानमारच्या उत्तर किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान या चक्रिवादळाचा मान्सूनवर थेट परिणाम होणार नसून, केरळात यंदाच्या वर्षी मान्सून वेळेतच दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मान्सूनवर वादळाचे परिणाम दिसून येणार नसले तरीही त्याची दिसा आणि गती मात्र वादळच ठकवू शकतं. साधारण पुढील चार दिवसांमध्ये हे चित्रही स्पष्ट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.