Maharashtra Weather : राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. तर मराठवड्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates)
मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पाच जणांचे बळी गेले आहेत. पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं भूईसपाट झाले आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. परभणीत अवकाळी पावसाचे 5 बळी गेलेत. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव हटकर शिवारात वीज पडून ओंकार शिंदे या 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय, यात त्याची आई गंभीर भाजली आहे, तर गुरुवारी सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक येथील नीता सावंत यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द इथं शेतात काम करीत असतांना 5 जणांच्या अंगावर वीज कोसळली, यात दोघांचा मृत्यू झालाय तर इतर तिघे जण जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये गारपिटी झाली. पातूर तालुक्यातील आस्टूल - पास्टूल, कोठारी बुद्रूक, कोठारी खुर्द, खानापूर, शिर्ला, देऊळगाव परिसरात अर्धा ते पाऊण तास गारांचा पाऊस पडला. गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा, आंबा, लिंबू, भाजीपाला आणि फुलांचं मोठं नुकसान झाले आहे. तर संत्रा पिकालाही गारपिटीचा फटका बसलाय. गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वाशिम जिल्ह्याला अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. वनोजा, वाई, वारला, पांगराबंदी, अमनवाडी, पिंपळशेंडा, वाघळूद या गावांसह अनेक ठिकाणी वादळी वा-यासह गारपीट आणि जोरदार पाऊस पडला. यामुळे शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, बीजवाई कांदा, भाजीपाला या पिकांसह संत्रा आणि आंब्याच्या फळबागाचं मोठं नुकसान झालं.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला पुन्हा गारपिटीनं झोडपलं. निजामपूर परिसरातील सिंदबन-आष्टी परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाली.. अक्षरश लिंबाच्या आकाराएवढ्या गारा पडत होत्या.. तब्बल एका तासापर्यंत ही गारपीट सुरु होती.. यामुळे परिसरात सर्वत्र बर्फ दिसून आला.
नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी जोरदार गारपीट झालेली पाहायला मिळाली. गारपिटीमुळे शेतक-याचं मोठं नुकसान झालं असून सर्वत्र गाराच गारा दिसत आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वा-यासह जोरदार गारपीटही झाली.. यामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय.. या पावसामुळे अजिंठा लेणीतील धबधबे कोसळू लागलेत. तर वाघूर नदीला पूर आलाय. काळदारी गावाचा पाझर तलाव ऐन उन्हाळ्यात ओव्हर फ्लो झालाय.
नाशिक जिल्ह्यात गारपीट सुरूच आहे. नाशिकच्या कळवण, दिंडोरीमध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात उन्हाळी कांदा, काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं. गेल्या 15 दिवसांत 3 वेळा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला. चांदवडच्या पूर्व भागातील पन्हाळे गावात सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटात वादळी वा-यासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झालं. यामुळे शेतकरी धास्तावलेत.
निफाडमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आलेत... सायखेडा चांदोरीसह परिसरातील गावांमध्ये रिमझिम पावसाने द्राक्षबागांना फटका बसतोय. अवकाळी पावसामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होतेय. किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये किलो भाव मिळणारी द्राक्ष, 10 ते 15 रुपये किलोने विकावी लागताहेत.
हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. यामुळे गहू, ज्वारी,कांदा या पिकाचे नुकसान होत आहे. सेनगाव परिसरात सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील काही झाड मोडून पडलीत. अवकाळी पावसामुळे शेतकरी नव्या आर्थिक संकटात सापडलाय.
लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, जळकोट तालुक्यात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यात जळकोट तालुक्यात विद्युत तारेचा शॉक लागून 2 शेळ्या दगावल्या. दिवसभर जिल्ह्याच्या अन्य भागांत हलके वारे वाहत होते, तसेच आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं.