महाविकास आघाडीचा गेम! महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, कसा फिरलं समीकरण?

Vidhan Parishad Election result  : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धक्का दिला असून महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत.  

सौरभ तळेकर | Updated: Jul 12, 2024, 07:39 PM IST
महाविकास आघाडीचा गेम! महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, कसा फिरलं समीकरण? title=
Maharastra Vidhan Parishad Election result

Maharastra Vidhan Parishad Election result: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. कारण 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुतीने 9 उमेदवार जाहीर केले होते. आता महायुतीचे 9 च्या 9 उमेदवार निवडून आले आहेत. आमदार संख्या कमी असताना देखील महायुतीने बाजी मारली अन् महाविकास आघाडीचा गेम केला आहे. नेमकं समीकरण कसं फिरलं? भाजपने आपला पाचवा उमेदवार निवडून कसा आणला? 

कसं फिरलं समीकरण ?

महायुतीनं 9 उमेदवार रिंगणात उतरवले होते. पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार मैदानात होते. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना तिकीट देण्यात आलं होतं. तसेच अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट निश्चित करण्यात आलं होतं, अशातच महायुतीचे हे सर्वाच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

योगेश टिळेकर यांना 26 मतं मिळाल्याने भाजपच्या बाजूने पहिला निकाल लागला तर प्रज्ञा सातव यांना 25 मतं मिळाली. त्यानंतर काँग्रेसच्या बाजूने देखील एक कौल लागला. अमित गोरखे यांना 26 मतं मिळाल्यानंतर भाजपला दुसरा कौल मिळाला. पण सर्वांची नजरा होत्या, पंकजा मुंडे यांच्यावर... पंकजा मुंडे यांना 26 मतं मिळाल्याने भाजपचा चौथ्या उमेदवाराने देखील बाजी मारली. तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना 22 मत मिळाली असताना 1 मतावरून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आडकली. तर दुसरीकडे परिणय फुके यांना 26 मत मिळाली. 

दुसऱ्या पसंतीची मतं मोजताना सदाभाऊ खोत यांचा विजय निश्चित मानला जात होता. सदाभाऊंना पहिल्या फेरीत २०.४८ मते पडली मिळाली होती. दुसऱ्या पसंतीच्या फेरीनंतर सदाभाऊ विजयी झाले. सदाभाऊ खोतांच्या विजयानंतर महायुतीने सर्वाच्या सर्व 9 जागा जिंकल्या आहेत. 

कुणाची मतं फुटली?

भाजपला एकूण मिळालेली मतं 118 होती. त्यामुळे भाजपला 15 मतं जास्त मिळाली. अजित पवार गटाला 5 मतं अधिकची मिळाली. तर शिंदे गटाला 11 अधिकची मतं मिळाली. तर काँग्रेसची 5 मतं नार्वेकरांना जरी काँग्रेसची गेली असं मानलं तरी यांची 7 मतं फुटली आहेत, अशी चर्चा होताना दिसत आहे. राष्ट्रवादीची सर्व 12 मतं शेकापच्या जयंत पाटलांना मिळाली आहे.

महायुतीचे विजयी उमेदवार

भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे  
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर