आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी गुडन्यूज? भीमा नदीवरील सर्वात उंच पुलाचे काम युद्धपातळीवर

त्यामुळे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची तसेच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

Updated: May 29, 2024, 03:34 PM IST
आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी गुडन्यूज? भीमा नदीवरील सर्वात उंच पुलाचे काम युद्धपातळीवर title=

Bhima River Bridge Inauguration : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर भीमा नदीवरील सर्वात उंच आणि लांब पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. येत्या जून अखेरपर्यंत पंढरपुरातील हा मार्ग सुरु होणार आहे. त्यामुळे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची तसेच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

सुमारे 625 मीटर लांबीचा पूल

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील पंढरपूर जवळील भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वात मोठ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आषाढी यात्रेच्या आधी हा पूल वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. हा पूल पंढरपूरपासून पुढे मोहोळपर्यंत जोडण्यात आला आहे. या मार्गांवर कौठाळी ते गुरसाळे दरम्यान सुमारे 625 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे काम अवघ्या 30 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून जे एम म्हात्रे इन्फ्रा कंपनीकडून हा पूल बनवण्यात आला आहे.  

वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार

आषाढी यात्रेत कायम वाहतूक कोंडी होते. यामुळे दिवसेंदिवस या वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पण आता पंढरपूर जवळच्या भीमानदीवर उभारण्यात आलेला मोठा पूल लवकरच सुरु होणार आहे. हा पूल इतक्या उंचीवर आहे की भीमानदीला महापूर आला तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. या पुलामुळे पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.

लवकरच होणार लोकार्पण

येत्या 17 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. त्यापूर्वी भीमा नदीवर पुलाचे लोकार्पण केले जाईल, असे म्हटले जात आहे. मात्र हा पूल कधी सुरु होणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.