Holi 2023 Special Buses For Kokan : गणेशोत्सवाबरोबरच होळीचा (Holi 2023) सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी हा सण 7 मार्च ला येत आहे. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी (MSRTC Extra Buses For Holi) सज्ज झाली असून महामंडळाने यंदा 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
3 मार्च ते 12 मार्च 2023 दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
वाचा: कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार!
एसटीच्या या जादा बसेस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागातून सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.