राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना

 रामाची आरती आणि जय श्रीरामच्या घोषणांनी नाशिकचे रेल्वे स्थानक दुमदुमलं. 

Updated: Nov 23, 2018, 07:39 AM IST
राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना title=

नाशिक : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना होत आहेत. काल रात्री उशिरा नाशिकमधून साडे बारशे शिवसैनिक एका विशेष गाडीनं अयोध्येकडे रवाना झाले. गाडी रवाना होते वेळी शिवसेना खासदार हेमंत गोडसेही उपस्थित होते. यावेळी रामाची आरती आणि जय श्रीरामच्या घोषणांनी नाशिकचे रेल्वे स्थानक दुमदुमलं.   नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक या विशेष गाडीतून रवान झाले.

कार्यक्रमात बदल 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत जाहीर सभा घेण्यावर बंदी आहे.

त्यामुळे आता जनसंवादाचा कार्यक्रम ठरवण्यात आला. उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत.

प्रथम संत महंतांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहतील.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामललाच्या दर्शनला जातील. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे.

शिवभक्त - रामभक्तांशी संवाद 

मंदिर वही बनाएंगे म्हणत लोकांना आणखी किती काळ मूर्ख बनवाल, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारलाय. उद्धव यांनी शिवनेरीवरील शिव जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. इथल्या मातीचा मंगलकलश घेऊन ते अयोध्येला रवाना होणार आहेत.

अयोध्येला जाण्यापूर्वी त्यांनी शिवनेरी गडावरच्या शिवजन्म स्थळाचं दर्शन घेतलं आणि उपस्थित शिवभक्त - रामभक्तांशी संवाद साधला.

आजवर  राममंदिर उभारणीच्या केवळ घोषणा झाल्या, आश्वासनं दिली गेली, पण राममंदिर उभं राहिलं नाही.

त्यामुळे आता आपण ताकाला जाऊन भांडं  लपवणार नाही तर आश्वासन न पाळणाऱ्यांचा भंडाफोड करणार असल्याचा टोला उद्धव यांनी भाजपचं  नाव न घेता लगावला.