राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर 'या' भागावर फक्त काळ्या ढगांची चादर

Maharashtra rain updates : काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळं आताच पाहून घ्या हवामान वृत्त   

सायली पाटील | Updated: Aug 5, 2023, 06:51 AM IST
राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर 'या' भागावर फक्त काळ्या ढगांची चादर  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/ Maharashtra rain updates heavy to very heavy raifall for next 4 days

Maharashtra rain updates : चार ते पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही अद्यापही पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. काही भागांमध्ये तर, पाऊस फक्त तोंडओळख करून देण्यासाठीच आला होता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. असा हा पाऊस पुढील चार दिवसांमध्ये विदर्भासह कोकण भागामध्ये मुसळधार बरसणार आहे. रागयग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

एकिकडे जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोकणातील बहुतांश भागांमध्येही पावसानं उघडीप दिली. पण, आता मात्र या भागावर पुन्हा एकदा काळ्या ढगांची चादर आल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी कोकणाला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती? 

कोकणाल मुसळधारीचा अंदाज असतानाच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागालाही पाऊस ओलाचिंब करणार आहे. तर, राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरावरही पावसाची कृपा राहणार असून, इथं दाट धुक्यांची चादर पाहायला मिळणार आहे. (Kolhapur, Satara) कोल्हापूर, साताऱ्यातही परिस्थिती काहीशी अशीच असेल. 

हेसुद्धा वाचा : राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?

 

(Mumbai, Navi Mumbai, Thane) नवी मुंबई, मुंबई, पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर भागात आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, अधुनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. तिथं बांगलादेशच्या किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. वाऱ्यांचा हा प्रवास पश्चिम- वायव्य दिशेनं पुढे येत असल्यामुळं पुढच्या आठवड्याची सुरुवातही राज्यात पावसानं होण्याची चिन्हं आहेत.

पावसाळी पर्यटनस्थळांवर गर्दी 

पावसाचे एकंदर तालरंग पाहता महाराष्ट्रावर त्याची कृपाच असल्याचं चिन्हं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता वर्षा पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुंबई- पुण्यापासून नजीक असणारे अनेक धबधबे, धरणं आणि तत्सं जलप्रवाहांवर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. माळशेज घाट, आंबोली घाट, वरंध घाटही याला अपवाद ठरत नाहीयेत. पण, पावसाळी दिवसांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता पाहता सध्या प्रशासनही दरड प्रवण क्षेत्रांबाबत सतर्क असून, नागरिकांनाही अशा भागांवर न जाण्याचा सल्ला देताना दिसत आहे. बऱेच घाटरस्ते, धबधबे आणि पावसाळी सहलींच्या ठिकाणी हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे.