Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठा धक्का बसला. अखेरचा जय महाराष्ट्र... साहेब मला माफ करा अशी भावनिक साद घालत पुण्यातले मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी (Vasant More) पक्षाला रामराम केला. वसंत मोरे पक्षातल्या काही वरिष्ठांवर नाराज होते. अनेकदा त्यांनी ही खदखद बोलून दाखवली. मध्यरात्री भावनिक पोस्ट करत मोरेंनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर काही तासातच मनसेचा (MNS) राजीनामा दिला..
म्हणून वसंत मोरे यांनी राजीनामा दिला?
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha 2024) मुद्द्यावरच वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असं बोललं जातंय. पण आता वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या बोलण्यावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर वसंत मोरे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. पण यावर अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापलं होतं, असं बोललं जातंय. तसंच सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा अशी समजही दिली होती. त्यामुळे वसंत मोरे नाराज होते. राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे बोलल्याची सल त्यांच्या मनात होती.
काय होती वसंत मोरेंची पोस्ट
वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमितसाहेबांचा मला फोन आला होता. ते म्हणले आजचा मोर्चा खूप छान झाला, मला समजलं तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता. पण मला तुम्ही दिसला कसे नाही, भेटला केस नाही...
मी साहेबांना बोललो, साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो त्याचा हा पुरावा... साहेब मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावलं चालतो होतो, असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल...' असं वसंते मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यावर अमित ठाकरे यांनी त्यांची कानउघाडणी केली होती.
वसंत मोरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
दरम्यान, मनसेला जयमहाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेतलीय. वसंत मोरे यांच्याशी चर्चा करून काँग्रेसमध्ये येण्याचा मोहन जोशींनी आग्रह केलाय. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे मोहन जोशींनी वसंत मोरेंना ही ऑफर दिलीय. त्यामुळे आता वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, आपल्याला सुप्रिया सुळे, संजय राऊत तसंच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही फोन केल्याचा दावा वसंत मोरेंनी केलाय. येत्या दोन दिवसात आपण भूमिका स्पष्ट करु असं वसंत मोरेंनी म्हटलंय..