अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात (Melghat) कुपोषण (Malnutrition), बालमृत्यू (Infant Mortality), मातामृत्यू (Maternal Mortality) अशा अनेक आरोग्याच्या समस्या (Health Problems) गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. आरोग्य विभागाकडून योग्य तो उपचार मिळत नाही तसेच मेळघाटातील रुग्णालयात योग्य त्या सोई सुविधा देत नसल्याचा आरोप नेहमीच आदिवासी (Tribal) करत असतात त्यामुळे बहुसंख आदिवासी हे डॉक्टरकडे जाऊन उपचार घेत नसल्याचे भयाण वास्तव मेळघाटात आहे
आरोग्य विभागाचा अजब दावा
दरम्यान मेळघाटातील 600 हुन अधिक मांत्रिकांना (Wizard) आजपासून आरोग्य विभाग (Department of Health) प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यांना मानधन म्हणून प्रति रुग्ण100 रुपये देखील दिले जाणार आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा यासाठी आता मांत्रिकच (भूमका) प्रशासनाला मदत करणार असल्याचा आरोग्य विभागाने दावा केला आहे. मांत्रिकांनी रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे
अनेक प्रश्न उपस्थितीत
भूमिकाच्या माध्यमातून मेळघाटातील बालमृत्यू, माता मृत्यू आणि आरोग्याच्या समस्या निकाली काढण्यात काही प्रमाणात यश मिळेल असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रनेला अपयश का आलं? त्यांना मांत्रिकाची मदत घ्यावी लागते? मेळघाटातील मांत्रिक आरोग्य विभागाला मदत करणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे
अनिस कडून निर्णयाचे स्वागत....
आरोग्य विभागाच्या या भूमिकेचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्वागत केलं आहे. पण इतकी वर्षे होईनही आरोग्य यंत्रणा का अपयशी ठरली हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आता आरोग्य यंत्रणेने आता आदिवासींचे आणखी प्रबोधन करून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणखी काम केलं पाहिजे असे आव्हान अनिसच्या वतीने करण्यात आले आहे.
बालमृत्यू रोखण्यात अपयश
मेळघाटात कुपोषणाची समस्या अजूनही कायम आहे. कुपोषणाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागासह इतर अनेक विभागांमार्फत अनेकवेळ अनेक योजना राबवल्या जातात. मात्र मेळघाटात बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. मेळघाटात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांचां अजूनही अभाव आहे. त्यातच शिक्षणाची वानवा, बेरोजगारी, प्राथमिक वैद्यकीय सोयीसुविधा आणि जनजागृतीचा अभाव हे प्रश्न कायम आहेत. मेळघाटातील आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते, या काळात गरोदर माता, लहान बाळांची आबाळ होते, त्यामुळे त्यांना योग्य आहार आणि उपचार मिळत नाहीत.
मेळघाटात अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली झाली की, ती एक शिक्षा समजली जाते, त्यामुळे यंत्रणेतच नकारात्मक भावना निर्माण होते, त्यामुळे या भागातील नेमणुका, पदोन्नती आणि बदलीसंदर्भात एक चांगले धोरण आखण्याची गरज असल्याचं स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे.