Konkan Monsoon Video : अतिमुसळधार पावसामुळं किल्ले रायगडावरील (Raigad) बुरूज आणि कातळावरून वाहणाऱ्या धबधब्यांनी सर्वांनाच धडकी भरली. किल्ल्याच्या पायरी मार्गावरून प्रचंड ताकदीनं वाहणारं पाणी पाहून इथं आलेल्या पर्यटकांचा पुरता थरकाप उडाला. ज्यानंतर आता याच पावसाळ्यातील आणखी काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये काही व्हिडीओ मनात भीतीची भावना निर्माण करत थरकाप उडवत आहेत, तर काही व्हिडीओंमध्ये दिसणारा निसर्ग नकळतच तिथं येण्यास अनेकांना खुणावत आहे.
पावसाळा आणि कोकण यांचं एक अतुट नातं असलं तरीही हाच पाऊस बऱ्याचदा भीतीत भर घालण्याचंही काम करताना दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा मार्लेश्वर तीर्कक्षेत्र आणि पर्यटनस्थळी असणारा धबधबा सध्या अशाच काहीशा कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. इथं सध्या अनेक धबधबे प्रवाहित झाले असून, येथील मुख्य धबधबासुद्धा पावसामुळे पूर्ण ताकदीनं ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्यानं प्रचंड रौद्र रूप धारण केल्याचं पाहून पाण्याच्या नुसत्या ताकदीचाच विचार करून काळजात धस्स होत आहे.
तीर्थक्षेत्र असल्या कारणानं मार्लेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. पण, आता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सध्या धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
इथं मार्लेश्वर धबधबा रौद्रय रुपानं सर्वांच्या नजरा रोखत असतानाच तिथं कोकणातीह आणखी एक ठिकाण पर्यटकांना खुणावत आहे. पावसाळ्यात कोकणाचा निसर्ग अधिक खुलून दिसतो डोंगरावरून पडणारे धबधबे धुक्याची चादर हे सगळं अनुभवायचं असेल सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा (भुईबावडा) या घाटातून एकदा प्रवास करायला असावा. कणकवली ते कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा (भुईबावडा) घाटातील विहंगमय दृश्य फोटोग्राफर तन्मय दाते यानं ड्रोन मधून टीपत येथील सृष्टीसौंदर्य सर्वांच्याच भेटीला आणलं आहे.