पुणे : राज्यातल्या रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १ पॉईंट ७४ टक्के इतकी ही वाढ करण्यात आली आहे. आजपासूनच रेडी रेकनरची ही दरवाढ अस्तित्वात आली आहे. यातली दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईतला रेडी रेकनरचा दर शून्य पॉईंट ६ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. मुंबईत रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी किंमतीत घर खरेदीचे व्यवहार होत असल्याचं समोर आल्यानं, ही कपात करण्यात आली आहे. तर सर्वाधिक म्हणजे ३ पॉईंट ९१ इतकी दरवाढ पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. पुणे शहरात १ पॉईंट ५६ टक्के इतकी वाढ केली गेली आहे.
आज म्हणजेच १२ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. राज्यात १.७४ टक्के, तर ग्रामीण भागात २.८१ टक्क्यांनी रेडीरेकनरच्या दरात सरासरी वाढ ही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून जाहीर करण्यात आली. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात १.२९ टक्के, तर महापालिकाच्या क्षेत्रात १.७४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक वाढ ही पुणे, पिंपरी-चिंचवड जिल्ह्यात करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मागील दोन वर्ष राज्य सरकारने रेडी रेकनरचे दर आहेत तसेच ठेवले होते. पण मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्या कामात अडकले होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचे रेडी रेकनरचे दर 31 मे 2020 पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर पुन्हा आदेश काढून पुढील आदेश होईपर्यंत त्याला स्थगिती कायम ठेवण्यात येत असल्याचे सुधारित आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले होते.
2011-12 - 18 टक्के
2012-13 - 37 टक्के
2013-14 -27 टक्के
2014-15 - 22 टक्के
2015-16 - 14 टक्के
2016-17 - 7 टक्के
2017-18 - 5.30 टक्के
2018-19 - वाढ नाही
2019-20 - वाढ नाही
2020- 21 - 1.74 टक्के