पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग, ठप्प असलेली वाहतूक सुरु

आता पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग आला आहे. बहुतेकजण आता मदत साहित्य आणि औषध वितरीत करण्यात गुंतले आहेत.

ANI | Updated: Aug 13, 2019, 10:32 AM IST
पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग, ठप्प असलेली वाहतूक सुरु title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पाणी ओसरत असले तरी अजून सांगलीत पाणी धोक्याच्या पातळीवर आहे तर कोल्हापुरात पंचगंगेचे पाणी वेगाने उतरत असून  चंदगड, शिरोळ तालुक्यात पुराचे संकट कायम आहे. दरम्यान, आता मदत कार्याला वेग आला आहे. बहुतेकजण आता मदत साहित्य आणि औषध वितरीत करण्यात गुंतले आहेत.  अनेक गावांत  वैद्यकीय शिबिर सुरु करण्याता आली असून डॉक्टर व वैद्यकीय साहित्यांसह गावागावात पोहोचले आहेत। मागील आठ दिवस वाहतुकीसाठी बंद असलेला पुणे-बंगळुरु महामार्ग काल खुला झाल्याने या मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे. मागील आठ दिवस शिरोलीजवळ महामार्गावर पाणी असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

दरम्यान, साथीच्या रोगांची भीती असल्याने राज्यातील अनेक शहरांतून वैद्यकीय पथकेही येथे दाखल झाली आहेत. अगदी बोटीत बसूनही पूरग्रस्तांची तपासणी करण्यात येत आहे. एनडीआरएफ, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराचे सैनिक मदत करण्यात अधिक सक्रीय झाले आहेत. अलमट्टी धरणातून विक्रमी ५ लाख ४० हजार क्युसेकचा विक्रमी विसर्ग सुरू झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावातील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. काही गावांमध्ये अद्याप थोडा पाणी असले तरी अनेक गावातील पाणी पूर्णपणे ओसरलं आहे. मात्र वारणा, कृष्णा, पंचगंगा या नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये अद्यापही पाच ते सहा फूट पाणी आहे. मागील नऊ दिवस शेतामधले पुराचे पाणी कायम आहे. वारणा नदीच्या तीरापासून जवळपास दीड किलोमीटर परिसरातील शेती अनेक अद्याप पाण्याखाली आहे. 

आठ दिवस शिरोलीजवळ महामार्गावर पाणी असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-पुण्याहून कोल्हापूर, बेळगाव, निपाणीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती. हजारो वाहन चालक तसेच प्रवासी यामुळे आठ दिवस ठिकाणी ठिकाणी अडकून पडले होते. नेहमीच वाहतुकीने ओसंडुन वाहणारा हा महामार्ग गेले आठ दिवस शांत होता.मात्र आता वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे कोल्हापुरात इंधनासह इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू झाला आहे. आता तर मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय पथकेही कोल्हापुरात दाखल झाली आहेत.