भारतीय संस्कृतीचं भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड? नियम व अटी लागू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीचं भान ठेवावं अशी विनंती मंदिर व्यवस्थापनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: May 18, 2023, 02:19 PM IST
भारतीय संस्कृतीचं भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड? नियम व अटी लागू title=

तुळजाभवानी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर (Shri Tuljabhavani Temple) व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मंदिरात वेस्टर्न कपडे (Western Dress) घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे. आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे हाफ पॅन्ट, बर्मुडा असे वेस्टर्न कपडे घालणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांचेवतीने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना मात्र जारी करण्यात आली नाही. 

अंग प्रदर्शक, उत्तेजक ,असभ्य किंवा अश्लील वस्त्रधारी तसंच हाफ पॅन्ट बर्मुडा धारकांना मंदिरात प्रवेश नाही असा उल्लेख या सूचना फलकावर करण्यात आला आहे. कृपया भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि सभ्यतेचे भान ठेवा अशी विनंती ही या फलकाद्वारे मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांना करण्यात आलीय. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी
तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे. स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी या निर्णयावर टीका केली आहे. तरुणांना नोकऱ्या कधी देणार ते सांगावं. तरुणांना आणि तरुणींना अक्कल असते काय घालावं काय घालू नये. आम्हाला ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीं. त्यामुळं असले चाळे त्यांनी बंद करावेत अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे. 

'ती' केवळ अफवा
दरम्यान, श्रीरामनगर भागातील तुळजाभवानी मंदिरावर नगरपरीषद हतोडा टाकणार असल्याची अफवा पसरल्याने शिर्डीत तणाव निर्माण झाला होता. बुधवारी रात्री सोशल मीडियावर एक फेक मेसेज व्हायरल झाला आणि त्यानंतर श्रीरामनगर भागातील नागरिक शिर्डी पोलीस स्टेशनसमोर जमा झाले. पोलिसांनी अशी कोणतीही कारवाई होणार नसल्याचं सांगत हा मेसेच केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. शिर्डीत कुठलाही तणाव आम्ही होऊ देणार नाही शिर्डीत शांतता राहील ,अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू असं शिर्डी पोलीसांनी स्पष्ट केलं आहे.