Eknath Shinde on MVA: जेव्हा चांगले लोक एकत्र येतात तेव्हा त्याला वज्रमूठ म्हणतात, ही तर वज्रझूठ आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ठाण्यात सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. सत्तेसाठी कोलांट्याउड्या मारणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार? असंही यावेळी ते म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपण 9 एप्रिलला अयोध्येला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
"सगळी खोटी आणि सत्तेसाठी हापापलेली लोकं एकत्र आली आहेत. सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं ही कसली वृत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ठिकाणी संभाजीनगर म्हणून घोषणा केली होती तिथेच ही सभा होत आहे यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. यामुळे बाळासाहेबांनाही यातना होत असतील," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. ते म्हणाले की, "स्वातंत्र्यवीरांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली होती. पण सत्तेसाठी कोलांट्याउड्या मारणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार?".
ज्या पक्षांनी संभाजीनगर नामांतरण करण्यास विरोध केला त्यांच्याबरोबरच सभा होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की "हेच तर दुर्देव आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून त्यांना चोख उत्तर मिळेल. बाळासाहेबांचं हे आवडीचं शहर होतं. ज्या राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल अपशब्द काढले त्यांचा निषेध करण्याची हिमत तरी दाखवणार आहेत का?".
नाना पटोले सभेसाठी अनुपस्थित राहण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की "हे तीन तिघाडा, काम बिघाडा आहे. हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत, विचारांसाठी नाही. शिवसेना-भाजपाची युती ही विचारांची युती होती. जे लोकांना 2019 साली अपेक्षित होते ती शिवसेना-भाजपाची युती होती. पण यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले. त्यांना सत्ता आणि खुर्चासाठी तिलांजली दिली".
तुम्हाला दगड म्हणून संबोधलं जाण्यासंबंधी विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं की "प्रभू श्रीरामाच्या हातांचा स्पर्श झाल्यानंतर ते दगड तरंगत होते. पण हे जे दगड एकत्र आले आहेत, ते पाण्यात टाकल्यावर लगेच बुडून जातील. हे सगळे छोटे, मोठे दगड एकत्र आले असून त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार".
एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपण अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं जाहीर केलं. "शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आम्हाला धनुष्यबाण मिळालं. हे धनुष्यबाण प्रभू रामाचंच आहे. यामुळे आम्ही 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहोत. गेल्यावेळी विमानातून उतरावं लागल्याने संधी हुकली होती. पण यावेळी आम्ही जात असून हा अस्मितेचा, श्रद्धेचा विषय आहे. आम्ही त्याकडे राजकारण कधी पाहिलेलं नाही आणि पाहणारी नाही".