HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा

बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

नम्रता पाटील | Updated: May 20, 2024, 01:07 PM IST
HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा title=

Maharashtra Board 12th Result Date : काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर महाराष्ट्र बोर्डाने बारावी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. आता येत्या 21 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहिल्यानंतर लगेचच निकालाची प्रिंटही घेता येणार आहे. 

'या' वेबसाईटवर पाहता येणार निकाल

राज्यातील 15.13 लाख विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी

यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील 15.13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख 60 हजार 46 विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख 81 हजार 982, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख 29 हजार 905, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37 हजार 225, आयटीआयसाठी चार हजार 750 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला होता. MSBSHSE नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

तसेच गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे ते 5 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना 27 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.